आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरील अफवा, संशयावरून पाच घटनांत ६ जणांना जमावाची मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद / वाळूज- लोकांनी कोणत्याही प्रकाराची शहानिशा करून संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे, असे कायदा सांगतो. जुने-जाणते लोकही माणुसकीचा संदर्भ देत हेच सांगतात. पण गेल्या तीन दिवसांत घडलेल्या घटना माणूस माणुसकी सोडू लागला आहे, असे सांगत आहेत. सोशल मीडियावरील अफवा, संशयावरून ५ घटनांत जमावाने सहा जणांना बेदम मारहाण केली. 


मुले चोरणाऱ्या टोळीतील दोघे पडेगाव येथील कासंबरी दर्ग्याजवळ परिसरात घुसल्याची आल्याची अफवा पसरली. यावरून विक्रमनाथ लालूनाथ (३५) आणि मोहन नाथ भैरुनाथ (३२, रा. दोघेही मध्य प्रदेश, ह. मु. हर्सूल सावंगी) यांना शुक्रवारी (१५ जून) सकाळी २०० जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


...अन् एकाने व्हिडिओ व्हायरल केला 
वाळूज गावातील एक कामगार महिला मुलांचे अपहरण करण्यासाठी आल्याचे समजून सोमवारी दुपारी जमावाने तिला बेदम मारहाण केली. या महिलेच्या पतीने पत्नीची बदनामी केल्याबद्दल पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. 


वास्तव काय...?
ती वाळूज परिसरातीलच रहिवासी असून भाड्याने खोली मिळते का, याचा शोध घेत होती. घरी परतण्यासाठी ती तिसगाव चौफुलीवर उतरून वाहनाच्या प्रतीक्षेत एका झाडाखाली बसली होती. तिचा व्हिडिओ काढून तो एकाने व्हायरल केला. 


मारहाण करू नका, फक्त पकडून ठेवा 
सध्या सर्वत्रच लहान मुलांचे अपहरण करणारी, चोरट्यांची टोळी आल्याच्या अफवा पसरत आहेत. असे संशयित दिसल्यास नागरिकांनी त्यांना पकडून ठेवावे पण मारहाण करू नये, असे आवाहन छावणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी केले. तर अफवा पसरवून मारहाण करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीशकुमार टाक म्हणाले. 


चोरट्यांची अफवा, शस्त्रांची परवानगी 
१४ जून रोजी रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास गावात चोरटे आल्याची अफवा पसरली. तिसगावकरांनी पोलिसांत धाव घेत गस्त वाढवा, अन्यथा आम्हालाच शस्त्राची परवानगी द्या, अशी मागणी विशेष पोलिस अधिकारी डॉ.भारत सलामपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दोन तास उशिरा पोहोचल्याचा आरोप ईश्वरसिंग तरैयावाले, नितीन पनबिसरे, कमलसिंग सूर्यवंशी, विजयेंद्र जैस्वाल, योगेश सलामपुरे, प्रेम साळवे यांनी केला आहे. 


पोलिस म्हणाले...
घटना कळताच १५ ते २० मिनिटांत फौजदार अमोल देशमुख यांच्या नेतृत्वातील पथक घटनास्थळी पोहोचले. चोरटे आल्याची केवळ अफवा होती. 

बातम्या आणखी आहेत...