आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीची वाटणी करून अनुदानाचे पैसे द्या म्हणालो तर अप्पा म्हणाले, मुलीचे लग्न बाकी आहे, म्हणून मारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी पाहणी करताना पोलिस. - Divya Marathi
घटनास्थळी पाहणी करताना पोलिस.

फुलंब्री, पीरबावडा - तालुक्यातील पीरबावडा येथील एका तीस वर्षीय मुलाने जन्मदात्या पित्याची किरकोळ वादातून हत्या करून शेतातील पळ्हाट्यावर जाळल्याची घटना शनिवार पहाटे (दि. १९) रोजी पीरबावडा येथे घडली. याबाबत वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. वडील-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने पीरबावडासह फुलंब्री तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. नारायण लक्ष्मण गाडेकर (५०) असे मुलाच्या हातून हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. सतीश नारायण गाडेकर (२५) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

   
फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथे शुक्रवार, १८ रोजी वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम बघून नारायण गाडेकर हे शेतात गट क्र. ३९९ मध्ये जनावरांच्या गोठ्याजवळ रात्री एक वाजेच्या सुमारास झोपण्यासाठी गेले. त्यांच्यापाठोपाठ त्याचा मुलगा सतीश नारायण गाडेकर गेला. जमीन नावावर करून द्या व विहिरीच्या अनुदानाचे पैसे मला द्या  या घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वेळी पिता नारायण व सतीश यांच्यात हाणामारी झाल्याने सतीशच्या डोक्यात पित्याविषयी राग होता. याच रागातून सतीशने वडिलांना लाकडी दांड्याने मारहाण केली. पित्याने पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने डोक्यात दांडा मारताच रक्ताची चिळकांडी उडाली. जागेवरच ते तडफडू लागले तेव्हा  पळ्हाट्यावर  वडिलांचा मृतदेह टाकला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तो रात्रीच जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला. 

 
घटना घडल्यानंतर १ किमी अंतर चालत येऊन त्याने रक्ताने माखलेले कपडे धुतले तेव्हा सकाळचे ४ वाजले असावेत. पत्नीने हे रक्ताचे कपडे का धुताय? असे विचारले असता माझा घोळांना फुटला, असा बनाव त्याने केला.  कपडे बदलून सतीश परत शेतात घटनास्थळी पोहोचला अर्धवट जळालेल्या मृतदेहावर परत पळ्हाट्याचा फास  टाकून व इतर लाकडे टाकून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न करू लागला. शेजारी शेतावर राहणारा नारायण गाडेकर यांचा पुतण्या प्रकाश भीमराव गाडेकर हा सकाळी शौचास गेला असता  सतीश काय जाळतोय हे पाहण्यासाठी ितकडे गेला. तेव्हा सतीश हा चुलत भावास म्हणाला, अप्पास मी शेतजमीन वाटून मागितली व विहिरीच्या अनुदानाचे पैसे द्या असे म्हटले असता अजून मुलगी लग्नाची बाकी आहे, तेव्हा तुला  काही मिळणार नाही, असे म्हणून मला भांडले. म्हणूनच मी अप्पाला संपवले असून आता अप्पास जाळतोय असे सांगितले. 


सतीश घराकडे निघून गेला. त्याच्यापाठोपाठ मृताचा पुतण्या प्रकाश हा गावात गेला. त्याने सदर घटना सांगितली तोपर्यंत अारोपी अंघोळ करून  सावळेश्वर मंदिरात जाऊन गांजाची नशा करत थांबला होता. दरम्यान, सकाळी घटनेची माहिती वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जनार्दन राठोड व सहकाऱ्यांनी आरोपी सतीशचा पाठलाग करून मारसावळी शिवारातील सावळेश्वर महादेव मंदिर येथून सतीशला अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आमले यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. अर्धवट जळालेला मृतदेह बाजूला काढून त्यांच्यावर वडोदबाजार प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. पी. सावंत यांनी प्रेताची उत्तरीय तपासणी जागेवरच केली. फॉरेन्सिक लॅबचे एस. एस. साबळे सहायक रासायनिक विश्लेषक यांनी मृतदेहाचे नमुने लॅब तपासणीसाठी संकलित केले. या वेळी सपोनि अर्चना पाटील, फुलंब्री पो. ठाण्याचे पो. उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्यासह डीवायएसपी पथक, श्वानपथक यांची उपस्थिती होती.  फिर्यादी प्रकाश भीमराव गाडेकर याच्या फिर्यादीवरून अारोपी सतीश नारायण गाडेकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...