आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्रावर पेरणी; पावसाची रिपरिप सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट दूर झाले. आतापर्यंत जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून पावसाचाही रिपरिप सुरू असल्याने बळीराजा सुखावला आहे. 


जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे रोखल्या गेल्या होत्या. दुबार पेरणीचे संकट समोर उभे ठाकलेले दिसत होते. मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. तुरळक स्वरुपात पाऊस पडत होता. ५ जुलैपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १९.५ टक्के पावसाची नोंद झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात ४१२.४ मि.मी.पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात २९७.२ मिमी पाऊस झाला होता. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस १९.८ टक्के होता. तुलनेत गेल्या वर्षापेक्षा आतापर्यंत जिल्ह्यात ८ टक्के पाऊस जास्त झाला आहे. तुलनेत परिस्थिती समाधानकारक आहे. 


पारोळ्यात जास्त पाऊस 
जिल्ह्यात सद्य:स्थितीत २७.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ४२.९ टक्के पाऊस पारोळा तालुक्यात झाला. बोदवड ३४.६ टक्के, चाळीसगाव ३३.५%, एरंडोल ३२.१%, धरणगाव ३२%, भडगावमध्ये ३०% पाऊस झाला. सर्वात कमी पाऊस भुसावळ १६ टक्के, यावल १९.९ टक्के, जळगाव २०.५ टक्के, जामनेर २०.९ टक्के, रावेर २४.६ टक्के, पाचोरा २६.६ टक्के, अमळनेर २८.७ टक्के, चोपडा २९.४ टक्के तर मुक्ताईनगर तालुक्यात २०.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...