आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीने राज्याचा कृषी विकास दर 8 टक्क्यांनी ‘कुरतडला’, कृषि विभागाच्‍या अप्‍पर सविचांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गतवर्षी बोंडअळी, कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्याचा कृषी विकास दर ८ टक्क्यांनी घटला, असे निदान राज्य कृषी विभागाचे अपर सचिव विजय कुमार यांनी केले.  नुकसान झाल्यावरचे संशोधन कुचकामी ठरते,  असे सांगून अशा प्रकारे  कीड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याच वेळी संशोधन, उपलब्ध तंत्रज्ञान, कृषितज्ज्ञांच्या बुद्धीचा वापर करून घेण्यावर भर देण्याची गरजही विजय कुमार यांनी व्यक्त केली.   


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणि खरीप आढावा बैठकीसाठी आलेल्या विजय कुमार यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, २००२ मध्ये बीटी वाण आले. २००६ मध्ये बीजी २ आले. बीटी वाणामुळे  उत्पादनात मोठी वाढ झाली. परिणामी लागवड क्षेत्रही वाढले.  कीटकनाशकांचा अति वापर झाला. हिरवी, ठिपका अळीला बीट जिनने अाळा घातला. मात्र, प्रथम  २०१५ मध्ये गुजरातमध्ये गुलाबी बोंडअळी आली. धुळे, नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात तिचे आगमन झाले. यावर वेळीच लक्ष दिले गेले नाही. परिणामी गत आर्थिक वर्षात पिकांचे ५ टक्के ते ९० टक्के नुकसान झाले.   तथापि, या  गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.  ५ टक्के पिकाच्या संरक्षणासाठी ५ टक्के रेफ्युजी लावणे आवश्यक असल्याचे विजय कुमार यांनी सांगितले. 

 

असे केले नियोजन   
पुढील खरिपाच्या नियोजनाबाबत त्यांनी सांगितले की, पीकनिहाय यादी, बंदी केलेले बियाणे व उपलब्ध करून देण्यात आलेले पर्यायी बियाणे, मोबाइलद्वारे संगणकीय प्रणालीमध्ये थेट अहवाल, ऑनलाइन पीक संरक्षण शिफारशी, एसएमएसद्वारे संरक्षण सल्ला, कामगंध सापळे देण्याबाबत निर्णय घेण्याबाबत विचार केला जाईल. एनआयसीकडून एप्रिलअखेर कीडरोग माहितीबाबत डॅशबोर्ड तयार करणे, डॅशबोर्डवर सर्व पीकनिहाय कीड व रोग व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती असेल. १० हजार ६२६ कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, उपविभागीय, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी सहसंचालक अशा सर्वांनी प्रति आठवडा दोन गावांत चार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्हिजिट करायची आहे.

 

बोगस बियाणे माथी मारणाऱ्यांना सोडू नका   
ज्या बियाणे कंपन्यांनी रीतसर परवानगी घेतलेली आहे, बियाणे दर्जेदार आहे, त्यांना अजिबात त्रास देऊ नका. पण जे बोगस बियाणे माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना अजिबात पाठीशी घालू नका, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी वेळीच सर्वांनी दक्ष राहून बोगसगिरीला आळा घालावा, असे आदेश दिल्याचे  विजय कुमार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...