आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या कामासाठी कुलगुरूंना गोंजारू, चुकले तर फटकारू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. यू. चोपडे यांनी विद्यार्थी हिताची अनेक चांगली कामे केली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत काही मंडळी जातीवरून कुलगुरूंना विनाकारण टार्गेट करत आहेत. अशा लोकांनी कुलगुरूंची नाहक बदनामी थांबवावी, यासाठी राज्यपालांनी कठोर पाऊल उचलण्याची मागणी करत बुधवारी सात संघटनांनी विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढला. चांगल्या कामासाठी कुलगुरूंना गोंजारू. मात्र, ते चुकले तर त्यांना फटकारू, अशी भूमिका या वेळी विद्यार्थी नेत्यांनी मांडली. 


कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या समर्थनार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, रिपाइं (खरात गट), एनएसयूअाय, शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषद आदी संघटनेचे ७० ते ७५ पदाधिकारी, विद्यार्थी, संशोधकांनी विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मुख्य इमारतीपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाने विद्यापीठ परिसर दणाणला. कुलगुरू के सन्मान मे, विद्यार्थी मैदान में, जातिवाचक संस्थाचालकांचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय, संस्थाचालकांचे दलाल मुर्दाबाद, कुरघोडी बंद करा अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. विद्यार्थी नेत्यांनी कुलगुरूंच्या समर्थनार्थ भाषण केले. एआयएसएफचे पदाधिकारी प्रशांत बोराडे म्हणाले, जातीनुसार एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणे चुकीचे आहे. त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. त्याबाबत कोणीच बोलत नाही. आम्ही कुलगुरूंच्या प्रत्येक कामाचे समर्थन करणार नाही. ते चुकले तर आम्ही त्यांना फटकारू. पण चांगल्या कामाचे कौतुक व्हावे, असे ते म्हणाले. आंदोलनानंतर संघटनेच्या प्रतिनिधींनी राज्यपालांसाठी एक निवेदन कुलगुरूंना दिले. या वेळी प्रकाश इंगळे, विजय धनगर, गुणरत्न सोनवणे, सचिन निकम, नीलेश आंबेवाडीकर, मनीष नरवडे, मनीष इंगळे, राहुल खंदारे, जयश्री शिर्के, सफा शेख, मोहन साळवे, प्रमोद देहाडे, अंकुश चव्हाण, अनिल दिपके, अॅड. कुणाल खरात, सिद्धार्थ मोरे, नागसेन वानखेडे, अविनाश सावंत, राहुल खंदारे, जयपाल सुकाळ, संतोष भुतेकर आदींची उपस्थिती होती. 


विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण खराब होतेय 
सम्यक विद्यार्थी आंदोलनचे प्रकाश इंगळे म्हणाले, गेल्या काही दिवसांत या ना त्या कारणाने कुलगुरू डॉ. चाेपडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण खराब होत आहे. अशा संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणी नोकरीवर ठेवतानाही विचार करेल. काही मनुवादी विचारांच्या लोकांनी जाणीवपूर्वक कुलगुरूंची बदनामी मोहीम चालवल्याचा आरोप त्यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...