आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी तयार केली अनोखी 'स्मार्ट ब्लाइंड स्टिक', मराठीतून देईल माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-क्षणभर डोळे मिटून चालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चाचपडायला होते. आपण कुठे पडणार तर नाही ना, अशी भीतीही वाटते. परंतु ज्यांच्या आयुष्यात निसर्गानेच अंधकार दिला आहे, अशा व्यक्तींसाठी काठीच प्रकाश असते. ही काठी अंधांसाठी मार्गदर्शक ठरावी यासाठी नाइलीटच्या (राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान संस्था, औरंगाबाद) विद्यार्थ्यांनी अडीच हजारांत अनोखी स्मार्ट ब्लाइंड स्टिक तयार केली आहे. ही स्टिक रस्त्यावरून चालताना समोर येणाऱ्या अडथळ्यांची मराठीत माहिती देते. भविष्यात अंधांसाठी ही स्टिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 
अंध व्यक्ती लाल-पांढऱ्या रंगाची काठी घेऊन चालतात. त्यांना रस्त्यावरून चालताना पत्ता कसा शोधावा, आपण योग्य रस्त्याने जात आहोत की नाही, रस्त्यात काही अडथळा, खड्डा तर नाही ना, अशी समस्या अनेकदा भेडसावते. ही बाब लक्षात घेऊन नाइलीट संस्थेत बी.टेक.च्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या नील जीवन रोकडे, राहुल कुमार आणि घनश्याम येडले या विद्यार्थ्यांनी स्मार्ट ब्लाइंड स्टिक तयार केली. या स्मार्ट स्टिकमध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि मायक्रो कंट्रोलर बसवण्यात आले आहे. यामुळे सहा फुटांवरील अडथळ्याची माहिती मराठीतून मिळणार आहे. स्टिकवर बझर आणि व्हायब्रेटरही बसवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या दिशांसाठी बझरचे वेगळे आवाज येतात. विद्यार्थ्यांनी बनवलेली ही स्टिक अतिशय उपयोगाची असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. 

 

अडथळ्यांची माहिती होते 
अंधांसाठी बनवलेली ही स्मार्ट ब्लाइंड स्टिक समोरील, डावीकडील व उजवीकडील अडथळे ओळखू शकते. भविष्यात यात आणखी बदल करून जीपीएस बसवण्यात येणार आहे. यामुळे अंधांना नियोजित स्थळी जाण्यासाठी मोठी मदत होईल. 

 

केवळ अडीच हजार रुपये खर्च 
ही स्मार्ट स्टिक बनवण्यासाठी २ हजार ५०० रुपये खर्च आला. यात मराठी भाषेचे सॉफ्टवेअर बसवण्यात आले आहे. याद्वारे एखादी वस्तू किती अंतरावर आहे याची माहिती मिळते. याचे पेटंट मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. - नील रोकडे, राहुल कुमार, विद्यार्थी