आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको, हडकोमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करा; एन.के.राम यांचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी पाणीप्रश्नाबाबत प्रभारी आयुक्तांना जाब विचारला. - Divya Marathi
उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी पाणीप्रश्नाबाबत प्रभारी आयुक्तांना जाब विचारला.

औरंगाबाद- सिडको, हडको भागांत सहा दिवसांनंतरही पाणी न आल्याने संतापलेल्या नगरसेवकांनी सोमवारी सकाळी दहा वाजता सिडको एन-५ च्या जलकुंभावर आंदोलन केले. महापौर नंदकुमार घोडेले, प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम यांनी भेट घेत लगेचच तोडगा काढू, अशी ग्वाही दिली. सिडको, हडको भागात शुक्रवारपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश यानंतर मनपात झालेल्या बैठकीत राम यांनी दिले. दरम्यान, आंदोलनानंतर काही भागांतच पाणी मिळाले. तसेच या आंदोलनामुळे समांतर योजनेसाठी आयोजित बैठक मात्र बारगळली. 


तीन दिवसांआड येणारे पाणी सहावा दिवस उजाडला तरी न आल्यामुळे हडको, सिडकोतील नगरसेवक संतापले. त्यांनी थेट जलकुंभ गाठून आंदोलन करत टँकर रोखले. दामू शिंदे, मनोज गांगवे, भाऊसाहेब जगताप, बालाजी मुंढे सर्वात आधी जलकुंभावर पोहोचले. तिथे एकही अधिकारी नसल्याने त्यांनी उपअभियंता ख्वाजा यांच्याशी संपर्क केला. ख्वाजा यांनी पुंडलिकनगर, शिवाजीनगरला गॅप देऊ शकत नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे नगरसेवकांचा पारा पुन्हा चढला. इतर नगरसेवकांना बोलावून घेत त्यांनी गेट बंद करून घेतले. त्यानंतर महापौरांसह प्रभारी आयुक्तांनी तिकडे धाव घेत सर्वांच्या उपस्थितीत मनपात बैठक घेतली. आठ दिवसांआड पाणी येते, अधिकारी फोन घेत नाहीत. हडको, सिडकोला १८ एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना ४ एमएलडी पाणी येत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. 


पाण्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आदेश देऊन महापौरांनी सर्वांची समजूत काढली. ही स्थिती हा उद््भवली, आपण काय उपाययोजना केल्या, या राम यांच्या प्रश्नावर कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल निरुत्तर झाले. बैठकीस उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेता विकास जैन, विरोधी पक्षनेता फेरोज खान, गटनेता मकरंद कुलकर्णी, प्रमोद राठोड, भाऊसाहेब जगताप, नासेर सिद्दिकी, प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम, वॉर्ड सभापती मनोज गांगवे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, गजानन मनगटे, राजू शिंदे, भगवान घडमोडे, राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, अॅड. माधुरी अदवंत, मीना गायके, पूनम बमणे, शहर अभियंता सखाराम पानझडे उपस्थित होते.


जलवाहिनी ठराव कागदावरच
नगरसेवक राजेंद्र जंजाळ म्हणाले, समांतर पाणीपुरवठा योजनेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास आधीन राहून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचा ठराव दोन महिन्यांपूर्वीच मंजूर करण्यात आला, तो कागदावरच असून प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याची तसदीही अधिकाऱ्यांनी घेतली नाही. 


पाण्याचे ऑडिट करा
शहरात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करून ऑडिट करण्याचे आदेश घोडेले यांनी दिले. एकाही जलकुंभावर किती पाणी येते, किती वाटप होते, याची कोणती माहिती नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीवरच विश्वास ठेवावा लागतो, असा मुद्दा प्रमोद राठोड यांनी मांडला. तसेच पुंडलिकनगर जलकुंभावरून पाणी देण्याची मागणी त्यांनी केली. 


अधिकाऱ्यांचे उपटले कान
विभागात किती अभियंते, कर्मचारी कार्यरत आहेत, याची माहिती चहल यांना नाही. त्यांच्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी शहराचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करावा, अशा शब्दांत महापौरांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले. 


तीन दिवसांत प्रश्न सोडवू
उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली. हर्सूलमधून होणारा पुरवठा थांबल्याने भार वाढला आहे. तीन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश राम यांनी दिले आहेत. त्यानुसार तीन दिवसांत नियोजन करून या भागाला पाणीपुरवठा केला जाईल, असे चहल म्हणाले. 


या भागात उद्या येणार पाणी

एन-५ गुलमोहर कॉलनी, एन-५ साऊथ, सत्यमनगर, एन-८, बरजंग कॉलनी, बजरंग चौक, लोकमत टाऊन सेंटर, आविष्कार कॉलनी या भागांना एक दिवस विलंबाने म्हणजेच मंगळवारऐवजी बुधवारी पाणी येईल. 


हर्सूल भागात टंचाई
हर्सूल वॉर्डातील फुलेनगर, यासीननगर, फातेमानगर या भागांना पाणी पुरवणाऱ्या विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे या भागाला महिनाभरापासून पाणी पुरवण्यात आले नाही, असे नगरसेवक बमणे यांनी सांगितले. येथे पाच हजार नागरिक राहत असून हातपंप, बोअर, टँकर आणि जारवर त्यांची मदार आहे. 


अशीही चर्चा 
समांतर योजनेबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी मनपा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार होती. आंदोलनामुळे ती बारगळली. समांतर हाेऊ नये, यासाठी आंदोलनाचा स्टंट केल्याचे काहींचे मत होते, तर समांतर लवकर यावी, यासाठी पाण्याचे गॅप वाढवून नागरिकांची मानसिकता बदलली जात आहे, असे काहींचे म्हणणे होते. 


अशी होती स्थिती 
रविवारी रात्री कमी दाबामुळे एन-६ एफ सेक्टर, शिवज्योती कॉलनी, चिश्तिया कॉलनी, एन-६ जी सेक्टर, एन- वन टाऊन सेंटर भागाला गॅप देण्यात आला. आंदोलनानंतर मुकुंदवाडी, जे सेक्टर, अंंबिकानगर, एन- २ ठाकरेनगर, म्हाडा मूर्तिजापूर, एन-आठ गणेशनगर या भागात पाणी देण्यात आले. 


दोन महिन्यांपासून तिढा 
दोन महिन्यांपासून या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जायकवाडीमधून दररोज १३५ एमएलडी पाणीपुरवठा होत असला तरी अनधिकृ़त नळांची संख्या जास्त असल्याने पाणी पुरत नाही. तसेच मोजक्याच भागाला पाच तास पाणी दिले जात असल्याने इतर भागांना पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. 


शिवाजीनगर, पुंडलिकनगरच्या जलकुंभाचा पर्याय.... 
 (सिडको-हडकोला तीन दिवसांआड पाणी देण्यासाठीचे पर्याय असे) 
१. पुंडलिकनगर, शिवाजीनगर जलकुंभातून त्या भागातील वसाहतींना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा कालावधी अर्धा तास ते ४५ मिनिटे कमी केला जाऊ शकतो 
२. एक्स्प्रेस लाइनवरील अनधिकृत नळजोडणी खंडित करण्याची मोहीम राबवली जाऊ शकते 
३. एक्स्प्रेस लाइनवरील एन-५ च्या जलकुंभात दोन तास आणखी पाणी आणले जाऊ शकते 

बातम्या आणखी आहेत...