आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव; रविवारी उद््घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडको येथील उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले असून त्यांच्या १३५ व्या जयंती दिनानिमित्त २७ मे रोजी सकाळी दहा वाजता उद््घाटन हाेणार आहे. तसेच जयंतीनिमित्त शहरात तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ते २८ मेदरम्यान हे कार्यक्रम होणार आहेत. 


शहरातील   स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीतर्फे महापौर बंगला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद तांदुळवाडीकर यांनी दिली. २६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता "मी अंदमानातील सावरकर बोलतोय 'व 'अनादि मी अनंत मी' हे प्रयोग वरद गणेश मंदिराच्या सभागृहात होणार आहेत. मनीषा पिंपळवाडकर, सौख्यदा गोसावी व प्रिया धारुरकर यांचा सहभाग आहे. २७ मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे होणार आहे. यात दहावी, बारावीनंतर आयटीआयचा अभ्यासक्रम पास झालेल्या विद्यार्थ्यांसह तंत्रनिकेतनची पदविका व अभियांत्रिकीची पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार आहे. यात व्हेरॉक, रिलायन्स मार्ट, वॉलमार्ट, ग्राइंड मास्टर, युरेका फोर्ब्ज या कंपन्या सहभागी होणार आहेत. २७ रोजी सकाळी १० वाजता सिडको पुलाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल करण्यात येणार आहे. २७ रोजी सायंकाळी ७ वाजता समर्थनगर येथील सावरकर पुतळ्यासमोर आक्षेप आणि खंडन यावर कार्यक्रम होणार आहे. सावरकरांवर अभ्यास असणारे सच्चिदानंद शेवडे हे प्रमुख वक्ते असतील. पार्थ बाविस्कर हे त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. 


प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार चंद्रकांत खैरे, निमंत्रक महापौर नंदकुमार घोडेले, पृथ्वीराज पवार, अप्पा बारगजे, सुरडकर, अनिल पैठणकर, विजया रहाटकर, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद तांदुळवाडीकर, सचिन वाडे, आशिष सुरडकर, लक्ष्मीकांत थेटे, शैलेश पत्की, सुधीर नाईक, पंकज भारसाकळे, मिलिंद दामोदरे, मारुती साळवे, अनिल खंडाळकर, कीर्ती शिंदे, रंजना कुलकर्णी, मनीष भन्साळी, शिल्पाराणी वाडकर, नूतन जैस्वाल आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 


सोमवारी समर्थनगर येथील पुतळ्याला अभिवादन 
२८ मे रोजी सकाळी आठ वाजता समर्थनगरातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या सिटी चौकातील पुतळ्यापासून शोभायात्रेला प्रारंभ होईल. त्याचा समारोप समर्थनगरातील सावरकरांच्या पुतळ्यासमोर होईल. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...