आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाच्या खात्यातून ऑनलाइन चोरी झालेले पैसे मिळाले परत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नमस्कार, मी बँकेतून बोलत असून तुमचे खाते बंद होणार. एटीएम, क्रेडिट कार्डची मुदत संपली आहे, असा कॉल करणाऱ्यांकडून आजपर्यंत अनेकांची फसवणूक झाली. अशीच फसवणूक झालेल्या शिक्षकाने चोवीस तासांच्या आत तक्रार करताच ग्रामीण सायबर पोलिसांनी आरबीआयच्या नियमांचा आधार घेत त्याचे ऑनलाइन वळती झालेले पैसे परत मिळवून दिले.

 

वैजापूर येथील श्यामसुंदर गुलाब पौंडे यांना ६ जून रोजी दुपारी अज्ञात क्रमांकावरून कॉल आला होता. मुंबई येथून बँकेच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या एटीएमला आधार कार्ड लिंक केले नसल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी त्याने पौंडे यांना कार्डचा क्रमांक मागितला. त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी घेतला. काही वेळातच त्यांच्या खात्यातून ४१ हजार ५५७ रुपयांची ऑनलाइन शॉपिंग झाली. त्यांनी लगेच ग्रामीण सायबर विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी तपास करून बँकेशी संपर्क केला. त्यानंतर आरबीआयच्या नियमांनुसार बँकेने पौंडे यांना त्यांची पैसे परत केले. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक एम. एम. सय्यद, कैलास कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश तरमाळे, याेगेश दारवंटे, जीवन घोलप, गजानन बनसोड यांनी कारवाई पार पाडली.

 

कसे मिळाले पैसे ? : पोलिसांनी २४ तासांच्या आत संबंधित बँकेशी संपर्क साधून नियमांच्या आधारे प्रक्रिया पार पाडली. बँकेनेही कारवाई करत वळते केलेले पैसे पौंडे यांच्या खात्यावर वर्ग केले. यासाठी बँकेच्या प्रक्रियेप्रमाणे वेळ लागतो.


 
काय आहे नियम?
रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे ऑनलाइन फसवणुकीत ग्राहकाने तीन दिवसांत तक्रार केल्यास बँकेला नोंद घ्यावी लागते. सर्व प्रक्रिया करून त्या खातेदाराच्या खात्यावर ९० दिवसांच्या आत पैसे जमा करावे लागतात. यात पोलिसांकडे २४ तासांत तक्रार करणे अपेक्षित आहे.

 

या आहेत अटी
तुमची फसवणूक करून खात्यातून पैसे वळते केल्यावर ते वॉलेट (ऑनलाइन ट्रान्झॅक्शन अॅप) ते वॉलेट खर्च केले असल्यास, ऑनलाइन शॉपिंग करून ते पैसे अॅप किंवा मोबाइल इंटरनेटव्दारे दिले असल्यास परत मिळतात. मात्र एटीएममधून कॅश स्वरूपात काढल्यास पैसे परत मिळत नाहीत.

 

नियम आहेत, परंतु जनजागृती नाही
आरबीआयच्या नियमानुसार ग्राहकाला पैसे परत मिळू शकतात. परंतु नियमांबद्दल जनजागृतीच झालेली नाही. ग्राहकांनी फसवणूक झाल्यास पोलिसांसह बँकेतही वेळेत तक्रार करावी.  
- देविदास तुळजापूरकर, राष्ट्रीय सहसचिव, एआयबीईए

 

कॉलला उत्तर देऊ नका
कुठलीही बँक तुम्हाला कॉलवर बँक खाते किंवा एटीएम, क्रेडिट कार्डची माहिती विचारत नाही. त्यामुळे कॉल, मेलला उत्तर देऊ नका.
- डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक.

बातम्या आणखी आहेत...