आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पोचालकास लुटले; पाठीमागून येणाऱ्या ट्रकने दरोडेखोराला चिरडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड / वडीगोद्री- सहा ते सात दरोडेखोरांनी तलवारीच्या धाकावर एका मिनी टेम्पो  चालकास लुटले. यानंतर एका ट्रक चालकाला लुटण्याच्या प्रयत्न करत असताना या ट्रक चालकाने दरोडेखोरांच्या अंगावर ट्रक घातल्याने एक दरोडेखोर चिरडला गेला. ही घटना औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धनलक्ष्मी जिनिंगजवळ बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली.  दरम्यान, घटनास्थळी जखमी दरोडेखोराचा मेंदू विखुरलेला असल्याने बहुधा तो जागीच ठार झाल्याचा अंदाज पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि महेश आंधळे यांनी व्यक्त केला.  दरोडेखोर मृतदेह घेऊन पसार झाले. 


गोंदी पोलिस ठाण्याचे सपोनि अनिल परजने  यांच्या माहितीनुसार, इस्माईल रुबाब पिंजारी (३३, रा.सुरत, गुजरात) हा आपला मिनी टेम्पो (जीजे ०५ बीव्ही ८८९४) घेऊन बीडहून  सुरतकडे जात होता. बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास  टेम्पो पाचोडपासून ४ कि.मी.वरील औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भाग्यलक्ष्मी जीनिंगजवळ येताच दरोडेखोरांनी तो अडवला. यानंतर इस्माईलला तलवारीचा धाक दाखवत लोखंडी टामीने बेदम मारहाण करीत त्याच्याकडील   ५ हजार रुपये मनगटी घड्याळ लुटले. त्यानंतर दरोडेखोर पाचोडकडे जाणाऱ्या ट्रकचालकाला लुटण्याच्या विचारात होते. ही बाब त्या ट्रकचालकाच्या लक्षात येताच त्याने दरोडेखोरांच्या अंगावर ट्रक घातला आणि सुसाट निघून गेला. यात एक दरोडेखोर चिरडला गेला. या घटनेनंतर इतर दरोडेखोर चिरडल्या गेलेल्या दरोडेखोराचा मृतदेह घेऊन फरार झाले. 

 

जखमी अवस्थेतही टेम्पो चालवला
दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी टेम्पो चालक इस्माईलने टेम्पो कसाबसा चालवत पाचोडच्या पुढे एका हॉटेलपर्यंत नेला. तेथे  त्याने हॉटेल चालकाला घडलेली सर्व हकिकत सांगितली. हॉटेल चालकाने ही माहिती तत्काळ गोंदी तसेच पाचोड ठाण्याला कळवली.  गोंदी  ठाण्याचे सपोनि अनिल परजने,  उपनिरीक्षक विकास कोकाटे, जमादार भास्कर आहेर, सय्यद यांनी हॉटेल गाठले.  पाचोड पोलिसही घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी इस्माईलला तातडीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात आणि प्रथमोपचारानंतर घाटी रुग्णालयात हलवले.  

 

घटनास्थळी सापडले साहित्य  
घटनास्थळी तलवार, एक पॅन्ट, एक रेन कोट, काही चिल्लर पैसे, चप्पल, पाकीट, ४५०० रुपये आणि त्याच्या बाजूला बॅटरी, आधार कार्ड, एटीम कार्ड, एक मेमरी कार्ड  सापडले आहे. या आधार कार्डमध्ये हरियाणा येथील पत्ता आहे. हे नेमकी पॅन्ट आणि रेनकोट चोरट्याचा आहे की आणखी कुणाचा, हे कळू शकले नाही. शिवाय रस्त्यावर रक्तमांसाचा सडाही दिसला. 

 

राष्ट्रीय महामार्ग बनला लुटमारीचे केंद्र
औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करणाचे काम    सुरू आहे. ही संधी  दरोडेखोर साधत अाहेत. डोणगाव दर्गा    ते आडूळ  या  मार्गावर अलीकडच्या दिवसात रात्रीअपरात्री वाहन चालकांना आडवून बेदम मारहाण करुन लुटण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दाभरुळ ता.पैठण शिवारात दरोडेखोरांनी एका कारमालकाला धारदार शस्त्राने भोसकून ठार मारले. तर चालकाला गंभीर जखमी करून दीड लाखाचा ऐवज लंपास केला. 

 

काय म्हणाले पाचोड पोलिस
पाचोड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक  आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या ट्रक चालकाने वाहन न थांबवता सरळ पुढे नेले असता  एक दरोडेखोर चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला असावा.  त्याच्या डोक्याचा  चेंदामेंदा होऊन  घटनास्थळी मेंदू विखुरलेला सापडला. दरोडेखोराचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागू नये, म्हणून अन्य दरोडेखोरांनी त्याचा मृतदेह सोबत घेऊन पळ काढला. सपोनि महेश आंधळे, 
पोलिस उपनिरीक्षक गोरक्षक खरड, रामदास राख, नरेंद्र आंधळे, शेख नुसरत गुंडेवार, संतोष भुमरे यांनी घटनास्थळी जाऊन  गंभीर जखमी झालेल्या मिनी ट्रकचालक इस्माईल रुबाब पिंजारी यास  तत्काळ पाचोड येथील  शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर प्रथमोपचार करुन औरंगाबाद घाटीत हलवले. ही घटना गोंदी ता.अंबड पोलिस ठाण्याअंतर्गत येते. 

बातम्या आणखी आहेत...