आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती टिकणे-दुभंगणे हाच मोठा फॅक्टर, 16 जागांवर होणार परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद - महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गत चार वर्षांत पार बदलली आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत रालोआने ४२ जागी विजय मिळवला हाेता. त्यात १८ शिवसेनेच्या आहेत. रालोआेत तेव्हा खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनाही होती. मोदींनी तेव्हा शेट्टींसाठी जाहीर सभाही घेतली होती. आता शेट्टी आघाडीच्या बाहेर     आहेत. तिकडे शिवसेना आघाडीत तर आहे, परंतु २०१९ ची लोकसभा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत दिसते.

 

 

त्यामुळे भाजपला राज्यात जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टींच्या मते, शिवसेना-भाजप सोबत लढले नाही तर फायदा शिवसेनेचाच होईल. किंबहुना सेनेला २५ जागा मिळतील, असे शेट्टींचे म्हणणे आहे. खरे तर आघाडी तोडल्याचा फटका भाजपप्रमाणेच शिवसेनेलाही बसू शकतो. युतीसंबंधीच्या निर्णयाचा थेट परिणाम विदर्भातील १० पैकी ८, मराठवाड्यातील ८ पैकी ४, पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी ९ आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांवर होऊ शकतो. आघाडी झाली नाहीतर दोन्ही पक्षांचा संयुक्त जागांच्या संख्येत ४१ वरून २५ अशी घट होऊ शकते. अर्थात एकूण १६ जागांवर थेट परिणाम होईल. त्याचा फायदा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला होईल, असा राजकीय विश्लेषकांना वाटते.


आघाडीबाबत सध्या भाजप अतिशय सावधगिरी बाळगताना दिसू लागले आहे. ही आघाडी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आगामी निवडणुकीत आम्ही जास्त जागा मिळवू ,असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. युती झाली नाही तरी जास्त जागा जिंकून दाखवू, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे आघाडी केली जाणार नाही, असा पवित्रा शिवसेनेेने घेतला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये स्वबळावर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे युतीची शक्यता नाही. शिवसेना २५ पेक्षा जास्त जागी विजय संपादन करेल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पूर्वीप्रमाणे एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, भाजपच्या विरोधात जनतेमध्ये असंतोष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आम्ही लोकसभा लढवू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे निवृत्त प्रोफेसर जयदेव डोळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्यांत वाढ झाली आहे. समाजातील एक महत्त्वाचा घटक धोरणांवर नाराज आहे.

 

> राज्यातील दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघातील राजकीय समीकरणे

विदर्भ : भाजप-सेनेचा गड
विदर्भात भाजपचे ६ व शिवसेनेचे ४ खासदार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे क्षेत्र आहे. भाजपने स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे भाजप बळकट झाले. सेेनेचा विरोध आहे. यवतमाळ-वाशीम सेनेचे गड आहेत. नागपूर गडकरींचा पक्का मतदारसंघ आहे.

 

मराठवाडा : भाजप कमकुवत

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याच मतदारसंघातील आहेत. लातूर दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा गड आहे. त्यांच्या निधनानंतर भाजप मजबूत झाला होते. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये भाजप कमकुवत झाला. युती न झाल्यास भाजपची वाटचाल कठीण आहे.

 

पश्चिम महाराष्ट्र: मोदी 

लाटेतही पवारांचा प्रभाव कायम
शरद पवारांचा प्रभाव असलेले क्षेत्र. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त समृद्ध. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही १० पैकी ४ जागी राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. त्यात पवार यांची कन्या सुप्रिया सुळेही आहेत. भाजप-सेना आता मजबूत झाले आहेत. आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादीला फायदा होईल. 

 

उ. महाराष्ट्र : खडसे व भुजबळांचा दबदबा 
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे प्रभाव क्षेत्र. परंतु पक्षावर नाराज असल्याने भाजपचे नुकसान होऊ शकते. धुळ्याचे डॉ. सुभाष भामरे यांचे क्षेत्र आहे. परंतु पकड मजबूत नाही. छगन भुजबळांमुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीची स्थिती चांगली आहे. शिवसेनाही मजबूत आहे. काँग्रेसचे अस्तित्व नाही.

 

तीन क्षेत्रे- विदर्भ, मुंबई-कोकण व उत्तर महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेचा जास्त प्रभाव राहिला आहे. राज्यातील ६५ टक्के क्षेत्रफळ या प्रदेशात येते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रावर प्रभाव आहे. राष्ट्रवादीला चार जागी विजय मिळाला होता. काँग्रेसला मराठवाड्यात केवळ दोन जागी यश मिळाले होते.

 

बातम्या आणखी आहेत...