आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील करबुडव्या व्यापाऱ्यांचा देशभर शोध; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली पत्रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद विभागातील तब्बल ५७७ उद्योजक, व्यावसायिकांनी १५४ कोटी रुपयांचा सेवा कर, एक्साइज आणि कस्टम ड्यूटी बुडवल्यात जमा आहे. यातील बहुतेकांनी संपूर्ण मालमत्ता विकून पळ काढल्याने ही रक्कम वसूल कशी करावी, असा प्रश्न केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालयाला पडला आहे. पर्याय म्हणून देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे पाठवून या उद्योजक, व्यावसायिकांची मालमत्ता शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.


मागील वर्षी वस्तू व सेवा कर लागू झाला. तत्पूर्वी औरंगाबादमध्ये केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क आयुक्तालय होते. या कार्यालयाचेही नाव वस्तू व सेवा कर आयुक्तालय असे झाले. दरम्यान, नवी करप्रणाली लागू झाल्यानंतर जुनी थकीत रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न वस्तू व सेवा कर आयुक्तालयाकडून सुरू आहे. औरंगाबाद आयुक्तालयांतर्गत असलेल्या औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण, जालना आणि नांदेड या चार विभागांतील थकबाकीदारांची यादी वस्तू व सेवा कर आयुक्तालयाने तयार केली आहे. 


काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने वसुलीस उशीर
आमचे कार्यालय औरंगाबादेत सुरू झाले तेव्हापासूनची ही थकबाकी आहे. बरीच वर्षे केसेस न्यायप्रविष्ट राहिल्याने वसुलीस विलंब झाला. फायनान्स अॅक्टमधील विविध अधिकारांचा वापर करून वसुलीचे काम सुरू आहे.  
- ए. जी. साबळे, सहायक आयुक्त, प्रिव्हेंटिव्ह, सीजीएसटी


बँकांकडेही पाठपुरावा

कर बुडवणाऱ्यांपैकी जर कुणाचे बँकेत पैसे असतील तर त्यावर कायद्याने वस्तू व सेवा कर आयुक्तालयाचा हक्क येतो. फायनान्स अॅक्ट १९९२ मधील कलम ८७ नुसार बँकेला नोटीस देऊन संबंधित व्यक्तीच्या खात्यातील रक्कम वळती करून घेण्याचा अधिकार या कार्यालयाला आहे. वसुलीसाठी असाही प्रयत्न सुरू आहे.


१५४ कोटी वसूलपात्र

मराठवाड्यातील चारही विभागामध्ये तब्बल १७८४ उद्योजक, व्यावसायिकांनी २२५५ कोटी रुपयांचा सेवा कर, एक्साइज व कस्टम ड्यूटी थकवलेली आहे. यापैकी १२०७ केसेस न्यायप्रविष्ट झाल्याने कारवाई करता येत नाही. उर्वरित ५७७ व्यावसायिकांकडे थकीत १५४ कोटींचा कर आज वसूलपात्र आहे. हे १५४ कोटी रुपये वसुलीचे आव्हान वस्तू व सेवा कर आयुक्तालयासमोर आहे. 


मालमत्ता विकल्या, देशभरात शोधमोहीम

 कर बुडवणाऱ्या ५७७ उद्योजक, व्यावसायिकांपैकी बहुतांश जणांनी आपली मालमत्ता विकलेली आहे. ज्या पत्त्यावर व्यवसाय होता, त्या जागा आता अन्य उद्योजक, व्यावसायिकांच्या ताब्यात आहेत. या मंडळींची देशभरात अन्य ठिकाणी मालमत्ता असेल तर ती ताब्यात घेण्यासाठी वस्तू व सेवाकर आयुक्तालयाकडून देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू आहे.


मॅन्युफॅक्चरिंगमधील कंपन्या आघाडीवर

कर बुडवणाऱ्यांमध्ये जवळपास ६० टक्के अॅसेसीज मॅन्युफॅक्चरिंगमधील सेक्टरमधील आहेत. याशिवाय कस्टम ड्युटी बुडवणाऱ्यांची संख्या कमी असली तरी त्यांची प्रत्यक्ष कराची रक्कम अधिक आहे. ५ कंपन्यांनी तब्बल ४८ कोटी रुपये कस्टम ड्युटी बुडवलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...