आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील वर्षी अख्खी महापालिका निवृत्त होतेय, पण आकृतिबंधाचा निर्णय होईना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- २०१९ च्या अखेरीस आज उच्च पदावर असलेले बहुतांश अधिकारी तसेच कर्मचारी निवृत्त होताहेत. इकडे २०१५ पासून महापालिकेचा आकृतिबंध तयार आहे. परंतु शासनाची मान्यता घेऊन नवीन कर्मचारी भरती करण्याकडे विद्यमान पदाधिकारी तसेच आयुक्तांना वेळ मिळत नाही. परिणामी पुढील वर्षी उच्चपदस्थ अधिकारी निवृत्त झाल्यानंतर आऊटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्यांकडून महापालिका चालवायची का, असा प्रश्न आहे. शासनाने पाच वेळा महापालिकेला स्मरणपत्र पाठवल्यानंतरही कर्मचारी भरतीचा आकृतिबंध अंतिम करून तो शासनाकडे पाठवलेला नाही. शनिवारी भाजप कामगार मोर्चाचे नेते संजय कणेकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्याची विनंती केली. त्यावर अभ्यास करून तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले. 


महापालिकेचा कर्मचारी भरतीचा आकृतिबंध तीन वर्षांपासून रखडला. जानेवारी २०१५ मध्ये आकृतिबंध व सेवा भरती नियम राजपत्रात प्रसिद्ध केले होते. त्यावर हरकती व सूचना मागवल्या व सुनावणी घेऊन ३० अधिकाऱ्यांनी प्रारूप आकृतिबंधावर हरकती व सूचना नोंदवल्या. आक्षेपांच्या सुनावणीनंतर सुधारित आकृतिबंध सर्वसाधारण सभेत ठेवून मंजुरीनंतर शासनाकडे पाठवणे गरजेचे होते; मात्र परस्पर तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याने तो शासनाने परत केला. त्यानुसार जुलै २०१७ च्या सर्वसाधारण सभेत तो मंजूरही झाला. मात्र ऐनवेळी प्रस्ताव मंजूर केल्याच्या तक्रारीने तो पुन्हा सभेसमोर ठेवला होता. आता दुसऱ्यांदा मान्यता दिली असून त्यालाही दोन महिने लोटले आहेत. तो अजूनही येथेच पडून आहे. तो शासनाने मंजूर केला तर दीड हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करणे शक्य होते. 


रिक्त पदेही भरेनात 
कर्मचारी- अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर भरती करण्यासाठी शासन मान्यतेची गरज लागत नाही. तरीही महापालिकेने रिक्त झालेल्या ५५९ जागा भरलेल्या नाहीत. या जागा भराव्यात, अशी मागणी केणेकर यांनी केली. ही भरती केली तर कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज पडणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...