आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद किरण थोरातांवर आज होणार अंत्यसंस्कार; कृष्णाघाटीमध्ये हल्ल्यात शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर/औरंगाबाद- वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील जवान किरण पोपट थोरात हा जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटीमध्ये हल्ल्यात शहीद झाल्याचे वृत्त कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.  लाडक्या भूमिपुत्राच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गावातील थोरात यांच्या शेतवस्तीवर गर्दी केली. किरण यांचे पार्थिव फकिराबादवाडी येथे आणण्यात येणार असून सकाळी साडेआठ वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. 


शहीद किरण यांचे पार्थिव एक तास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.  शेतशस्तीवर किरण  यांचे आई-वडील, भाऊ, पत्नी, पाच महिन्यांचा मुलगा श्लोक व मोठी मुलगी श्रेया आदी राहतात. दहावीपर्यंत लाडगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये शिक्षण झाल्यानंतर विनायकराव पाटील महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. २ मार्च २०१३ रोजी येवला तालुक्यातील सायगाव येथील आरती हिच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांनी सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला होता.  जानेवारी महिन्यातच ते १५ दिवसांच्या सुट्टीवर घरी आले होते.  किरण यांचा मोठा भाऊ अमोल हे शेती करतात. किरण  सुटीवर  आल्यानंतर शेतीकामात मदत करत होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी  सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा सैनिक अधिकारी आर. जाधव, तहसीलदार सुमन मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, वीरगावचे एपीआय अतुल येरमे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरनारे, पंकज ठोंबरे, बाबासाहेब जगताप, रमेश सावंत आदींनी भेट देऊन थोरात कुटुंबीयांचे सांत्वन केले.


शहीद  थोरात अमर रहे, घोषणांनी विमानतळ दणाणले
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ व राजौरी जिल्ह्यात  पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात  नियंत्रण रेषेवर शहीद झालेले आैरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र किरण पोपटराव थोरात (३१) यांचे पार्थिव गुरुवारी (१२ एप्रिल) चिकलठाणा विमानतळावर सायंकाळी विशेष विमानाने आणण्यात आले. “किरण थोरात अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.या प्रसंगी विमानतळावर आ. अतुल सावे, इम्तियाज जलील, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड . देवयानी डोणगावकर, राष्ट्रवादीचे अभिजित देशमुख , विनोद पाटील, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त मिलिंद भारांबे, पोलिस अधीक्षक आरती सिंह, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्य सचिव प्रकाश कुलकर्णी, तालुकाध्यक्ष विष्णू गोरोडे, प्रकाश देशपांडे , माजी महापौर भागवत कराड आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...