आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलाव नाही तरीही वाघाडी वाळूपट्ट्यात उपसा; तहसीलसमोरून जातात वाळूच्या हायवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण -  एकाही वाळूपट्ट्याचा लिलाव झाला नसताना वाघाडी वाळूपट्ट्यात खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. यंत्र व ट्रॅक्टरच्या साहाय्याने वीस ते तीस वाळू तस्कर खुलेआम नदीतून वाळू उपसा करून काठावर काढत असल्याचे चित्र दिसत आहे. याप्रकरणी तहसीलदारांना विचारले असता ते म्हणतात, एकाही वाळूपट्ट्याचा लिलाव नाही, कुठे उपसा होत असल्यास कारवाई करू, असे अाश्वासन देत असले तरी वाळूचे हायवा ट्रक राजरोसपणे तहसीलसमोरून जात आहे. मात्र महसूल प्रशासन पथक स्थापन करण्यातच मग्न आहे. 

 
काही दिवसापूर्वीच दिव्य मराठीने आता बैलगाडीतून अवैध वाळू उपसा होत असल्याचे सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. तेव्हा महसूल प्रशासनाने पथक पाठवून  उपसा तर रोखला, परंतु आता पुन्हा खुलेआम नदीतून यंत्राच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे.   


पैठणमध्ये सध्या २४ तास उपसा सुरू असून तो पुन्हा रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अवैध वाळू उपशामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याने नुकसान होत आहे. पैठणच्या वाळूला औरंगाबाद, जालना, नगर भागात सोन्याचा भाव मिळत असल्याने पैठणमधील वाळूचा लिलाव नसताना ही येथील वाळूची तस्करी थांबत नाही.

 

सध्या अनेक दिवसांपासून दादेगाव, आपेगाव, आवडे उंचेगाव आदी ठिकाणाहून कमी प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत असताना आता वाघाडी या ठिकाणी लिलाव नसताना मोठ्या  प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे.

 

वाघडी, सकाळी ११.४० वाजता परवानगी असल्यागत उपसा 

वाघाडी वाळूपट्ट्याचा लिलाव झाला नाही. असे असले तरी येथे आरी यंत्राच्या साहाय्याने दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 

सायं. ४.३० वा.कारवाई पोलिसही नदीपात्रात.... 
वरिष्ठांकडून आदेश धडकताच पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इमले व कर्मचारी थेट वाघाडी पट्ट्यात गेले. परंतु त्यांच्या हाती साहित्याशिवाय काहीच लागले नाही. त्यांनी ते साहित्य जप्त केले आहे. कारवाई अणखी कडक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

 

उपसा करणारे पळाले
वाघाडी येथील वाळूचा लिलाव झालेला नाही.  तेथे वाळू उपसा सुरू असल्याचे कळताच काही कर्मचारी पाठवले होते. हे कर्मचारी तेथे जाताच वाळू उपसा करणारे पळून गेले. 
- महेश सावंत, तहसीलदार.

बातम्या आणखी आहेत...