आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटरचे उकळते पाणी झोपेत अंगावर पडून तीन मुलींचा मृत्यू, सुटीत मामाच्या घरी आल्या होत्या मुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- दोन दिवसांपासून गेलेली वीज मध्यरात्रीच्या आल्यानंतर घरात नजर चुकीने सुरू राहीलेल्या हिटरमधील पाणी उकळून बाहेर आले. उकळते पाणी अंगावर पडून उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या दोन मुलींसह मामाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथे गुरुवारी (ता.7)मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत मामी देखील गंभीर भाजली असून तिच्यावर लातूर येथे उपचार सुरु आहेत.

 

दुर्गा बिभीषण घुगे (वय- 10, रा.सोनपेठ, जि.परभणी), धनश्री पिंटू केदार (वय-10, रा.व्हट्टी, ता.रेणापूर, जि.लातूर) आणि आदिती संभुदेव भताने (वय-4) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. दुर्गा आणि धनश्री या दोघी उन्हाळ्याच्या सुट्टीत अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथील त्यांचे मामा संभुदेव दत्तात्रय भताने यांच्याकडे आल्या होत्या. रात्री दुर्गा, धनश्री, आदिती आणि संभुदेवची पत्नी संगीता (वय-24) या घरात झोपल्या होत्या. गावात दोन दिवसांपासून वीज नसल्याने सकाळी सुरु केलेल्या हिटरचे बटन तसेच सुरू होते. मध्यरात्रीच्या वीज आल्याने हिटर सुरु झाले. हिटर वितळल्याने उकळते पाणी बाहेर झोपेत असलेल्या तीन मुलींसह संगीता यांच्या अंगावर पडले.

 

जखमी चौघांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान सुरूवातीला आदितीचा मृत्यू झाला. यातील दुर्गा, धनश्री आणि संगीता यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना लातुरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी दुर्गाचा आणि बुधवारी धनश्रीचा मृत्यू झाला. संगीता भताने यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आदिती, दुर्गा, आणि धनश्री यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...