आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत संस्थाचालकाकडून महिलेवर 3 वर्षे अत्‍याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शाळेत नोकरी लावून देतो म्हणून संस्थाचालकाने दहा लाख रुपये घेऊन ३४ वर्षीय महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात बुधवारी संस्थाचालक, एक शिक्षक आणि शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. संस्थाचालकाने बलात्कार केला व दोघांनी प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

 
अविनाश अनंतराव जाधव (४५, रा. देवळाई चौक) असे संस्थाचालकाचे नाव आहे. वाळूज परिसरात त्याची शाळा आहे. ३४ वर्षीय विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्याने ती सिडकोत एकटी राहते. चार वर्षांपूर्वी तिची ओळख मैत्रिणीचा पती असलेल्या अविनाशसोबत झाली. अविनाशच्या वाळूज, नांदेड येथे संस्था, कॉलेज, वसतिगृह आणि बालगृह आहे. या संस्थेमध्ये शिपाई पदाची नोकरी लावतो, असे म्हणत अविनाशने विवाहितेसोबत ओळख वाढवली. आॅक्टोबर २०१४ मध्ये शिपाई पदाच्या नोकरीची आॅर्डर देतो, असे म्हणत त्याने घरी बोलावले. त्या वेळी घरी कोणीही नव्हते. त्या वेळी अविनाशने विवाहितेवर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर अविनाशने दोनपैकी एका संस्थेचा अध्यक्ष करतो, नोकरीला लावतो, असे आमिष दाखवत तीन वर्षे विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केला. 


अविनाशने घरी बोलावले असता संस्थेतील शिक्षक सुरेश शंकर शिपणे (४८, शिवाजीनगर), शिपाई प्रताप आनंद पाटील (३७) हेही त्या ठिकाणी होते. त्या वेळी शिपणे आणि पाटील यानेही महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद केले आहे. शिपाई पदाची नोकरी तर मिळालीच नाही, मात्र संस्थाचालक आणि त्याच्या साथीदाराकडून अत्याचार होत असल्याने कंटाळलेल्या महिलेने मंगळवारी रात्री सिडको पोलिसांत तिघांविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अविनाश जाधव, सुरेश शिपणे आणि प्रताप पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी या तिघांना त्यांच्या घरून अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, तेजराव निंभोरे, कमल गदर्ई हे पुढील तपास करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...