आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमा, विरुपाक्ष कुलकर्णी यांचा आज मुक्त संवाद; स. भु.मध्ये रंगणार मैफल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- समृद्ध कन्नड साहित्य मराठीमध्ये अनुवादित करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी आणि मराठीतील समृद्ध साहित्य कन्नडमध्ये अनुवादित करणारे विरुपाक्ष कुलकर्णी यांचा परस्परांशी मुक्त संवादाचा कार्यक्रम ९ जून रोजी 'दिव्य मराठी'तर्फे आयोजित करण्यात आला आहे. भाषांच्या भिंती ओलांडणारी ही मैफल स. भु. शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोरील मैदानावर सायं. ६ वाजता रंगणार आहे. 


अनेक भारतीय लेखकांनी त्यांच्या मातृभाषेत रसिकांचे विश्व विस्तारित करणारे विपुल लेखन केले आहे. त्यातील महान कन्नड लेखक भैरप्पा, यू. आर. अनंतमूर्ती, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी, डॉ. शिवराम कारंथ यांची सुमारे ५५ पुस्तके डॉ. उमा कुलकर्णी यांनी मराठी भाषिकांसाठी अनुवादित केली आहेत. साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. त्यांचे पती विरुपाक्ष कुलकर्णी यांनी मराठी साहित्य कन्नड भाषेत अनुवादित केले आहे. त्यात प्रामुख्याने वि. दा. सावरकर यांचे माझी जन्मठेप, सुनीता देशपांडे यांचे आहे मनोहर तरी, भैरप्पा-कारंथ लेखन समीक्षा, विश्वनाथ खैरे यांचे मिथ्यांचा मागोवा यांचा समावेश आहे. पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वाङ््मय या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले आहे. मुंबई- कर्नाटक संघाचा वरदराजन आद्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 


महान लेखकांची पुस्तके अनुवादित करताना त्यांना नेमके काय अनुभव आले. नव्या पिढीला अनुवादाच्या क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी कितपत वाव आहे, अशा अनेक मुद्द्यांवर ते मनमोकळा संवाद साधणार आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन 'दिव्य मराठी' तसेच स.भु. शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आले आहे. (पाऊस असल्यास कार्यक्रम स.भु. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय सभागृहात होईल.) 

बातम्या आणखी आहेत...