आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'समांतर'च्या ठेकेदाराकडे पुन्हा काम जाण्याच्या शक्यतेने मनपानेच हातपाय बांधून घेतले, म्हणून आज पाणीटंचाई!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दत्ता सांगळे/हरेंद्र केंदाळे- ऑक्टोबर २०१६ मध्ये महापालिकेने समांतरचा करार रद्द करून पाणीपुरवठा ताब्यात घेतला. पण कोणत्याही क्षणी ठेकेदार पुन्हा येणार या भीतीपोटी तेव्हापासून पाणीपुरवठ्याची अत्यावश्यक कामेही केली नाहीत. आपण आज काम हाती घ्यायचे, त्यावर काही कोटी रुपये खर्च करायचा अन् उद्या ठेकेदाराकडे योजना गेल्यास आपलीच चौकशी व्हायची म्हणून अधिकाऱ्यांनी ही कामेच केली नाहीत. म्हणूनच शहरांवर पाणीटंचाईचे संकट आल्याचे 'दिव्य मराठी'ने तज्ज्ञांसोबत १२५ किलोमीटर प्रवास करून केलेल्या पाहणीत समोर आले. 


शहरात दोन महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. सिडकोला हक्काचे पाणी मिळत नाही, अशी ओरड होते. याच्या कारणांचा शोध 'दिव्य मराठी'च्या ५ जणांच्या टीमने तज्ज्ञसोबत जायकवाडीपासून ते शहरातील जलकुंभापर्यंत अभ्यास करून घेतला. तेव्हा नाथसागरातून १५० एमएलडी पाण्याचा उपसा होतो. नक्षत्रवाडीपर्यंत १३५ एमएलडीपर्यंत पाणी पोहोचते. तेथून शहराच्या वेगवेगळ्या भागांत हे पाणी जाते. याच पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले व आहे तीच यंत्रणा दुरुस्ती करून वापरली तर पुढील किमान दोन-तीन वर्षे शहराला पिणे, वापरासाठी पाणी मिळू शकते, ही बाब प्रकर्षाने समोर आली. समांतर पुन्हा ठेकेदाराकडे गेले तर योजना पूर्ण होण्यासाठी ४ ते ५ वर्षे लागतील. ठेकेदारालाही तात्पुरत्या उपाययोजना कराव्या लागतील. खरे तर त्या मधल्या काळात मनपाने करणे अपेक्षित होते. तसे झाले नाही. 


½ ने तज्ज्ञांसोबत १२५ किलोमीटर्स फिरून घेतला वेध 
पंपांची क्षमता वाढवण्यासाठी तातडीने ओव्हर ऑइलिंग केले तरी पाणीपुरवठ्याच्या स्थितीत पडू शकतो बराचसा फरक, महापालिकेने यंदा तेही केले नाही 


पुरेसे जलकुंभ नसल्याने बायपासचा फटका 
शहराच्या जुन्यासह अनेक भागांना बायपासद्वारे पाणी दिले जाते. बायपास म्हणजे जलकुंभ न भरता थेट पाणी भरणे. बायपासने पाणी देण्याची गरज का निर्माण होते, तर पुरेसे जलकुंभ नाहीत. बायपासने पाणी देत असताना जलकुंभापर्यंत जाणाऱ्या वाहिनीलगत असलेल्या भागांना जास्त वेळ पाणीपुरवठा होतो. त्याचा फटका अन्य भागांना बसतो. 


गरज पंप बदलणे, गाळ काढणे 
१९७५ ला ७०० मिमी आणि १९९१ ला १४०० मिमीची वाहिनी टाकण्यात आली. त्यासाठी ४५० एचपीचे ६ आणि दोन अतिरिक्त असे ८ पंप लावण्यात आले. हे पंप अजून बदलण्यात आलेले नाहीत. त्यांचे आयुष्य जास्तीत जास्त १५ वर्षे असते. आता हे पंप बदलून हौदातील गाळ काढला तर उपसा वाढणार नाही. पण उपयोगिता वाढेल. मध्येच दुरुस्तीची वेळ येणार नाही. 


ओव्हर ऑइलिंग झाल्यास फरक 
या उपाययोजना केल्या तर आपण आजचे मरण उद्यावर ढकलू शकतो. अर्थात नवीन वाहिनी, ४२ कुंभ, अंतर्गत नवीन वाहिन्या यासाठी वाढीव पाणीपुरवठा प्रकल्प गरजेचाच आहे. दरवर्षी पंपांचे क्षमता वाढवण्यासाठी ओव्हर ऑइलिंग करावे लागते. यंदा व्यग्रतेमुळे ते करण्यात आलेले नाही. ते झाले तरी बराच फरक पडू शकतो. 


सध्या काय स्थिती
येथील सध्याचे जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने बायपासद्वारे पाणी द्यावे लागते. नक्षत्रवाडी ते जलकुंभापर्यंतचे अंतर आणि गळतीही जास्त आहे. तेथे नव्याने जलकुंभ झाले तर वाढीव लोकसंख्येला पाणी देणे शक्य होईल. 


फारोळ्यात तातडीने हवा नवा शुद्धीकरण प्रकल्प 
फारोळ्यातील जलशुद्धीकरण प्रकल्प २४ तासांत पूर्ण क्षमतेने १५० एमएलडीपेक्षा जास्त पाणी शुद्ध करू शकत नाही. तेथे नवा प्रकल्प उभारणे समांतर योजनेत प्रस्तावित आहे. त्याचे काम तातडीने हाती घ्यायला हवे. अतिरिक्त प्रकल्प असेल तर आणीबाणीच्या परिस्थितीत डीएमआयसीचे पाणी घेता येईल. 


७०० मिमीसाठी बिडकीन येथे हवे नवे उपसा केंद्र 
७०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीची आधी २८ एमएलडी पाणी आणण्याची क्षमता होती. नंतर गरज वाढल्याने ती दुप्पट म्हणजे ५६ एमएलडी केली. त्यासाठी ढोरकीन येथे संप (हौद) बांधला. जायकवाडीतील पाणी त्या हौदात टाकून तेथून पुन्हा उपसा केला. जायकवाडीतून थेट फारोळ्यात पाणी आणताना ते कमी दाबाने व कमी प्रमाणात येते. कारण अंतर जास्त आहे. वाहिन्यांवर दाब येतो. परंतु जेव्हा ते ढोरकीन येथील संपमध्ये टाकले जाते. तेव्हा दाब व प्रमाण जास्त असते. तसेच १४०० मिमी वाहिन्यांच्या बाबतीत केले तर किमान २० एमएलडी पाणी वाढू शकते. त्यामुळे मनपाने तातडीने नवीन संप बांधावा, अशी तज्ज्ञांची सूचना आहे. 

 

दहा नव्या जलकुंभांची तातडीने गरज 
समांतर योजनेत ४२ जलकुंभ होणार होते. त्यातील किमान १० कुंभ उभारले तर सध्याची तहान भागू शकते. मनपाने दीड वर्षापूर्वी १० कुंभ उभारणी सुरू केली असती तर ते आज पूर्ण झाले असते व बायपासद्वारे पाणी देण्याची गरज पडली नसती. आताही काम सुरू केले तर वर्ष-दीड वर्षात जलकुंभ उभे राहू शकतात. सध्याची यंत्रणा जास्तीत जास्त पुढील दोन उन्हाळे (२०२०) सोसू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. 


उपकरणांचा साठाच नाही 
ठेेकेदार कंपनी कधीही येऊन ताबा घेऊ शकते. आपण वर्षभराचा साठा करून ठेवला अन् उद्या कंपनीने ताबा घेतला तर अनावश्यक खर्च केल्याचा ठपका अधिकाऱ्यांवर ठेवला जाईल. म्हणून जायकवाडी पंप हाऊसच्या ठिकाणी ऐनवेळी लागणाऱ्या इलेक्ट्रिकल वस्तूंचा साठाच नाही. गरज पडल्यास पदरमोड करून कर्मचारी खरेदी करतो. त्याला वेळेत पैसे मिळत नाहीत. 


ट्रान्सफॉर्मर बदलले नाही 
जायकवाडी येथे १९९१ मध्ये उभारलेले स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर आहे. त्यात काही दुरुस्ती करायची असेल तर वीजपुरवठा बंद ठेवावा लागतो. आता अत्याधुनिक पद्धतीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये दुरुस्ती करत असताना वीजपुरवठा खंडित करण्याची गरज नसते. त्याला ऑनलाइन दुरुस्ती म्हणतात. नव्या ट्रान्सफॉर्मरमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही. परंतु यासाठी मनपाने १५ लाख रुपये खर्चण्याची तयारी केली नाही. 


२७ वर्षांमध्ये एकही नवी योजना नाही 
पूर्वी शहराला नहर ए अंबरीतून पाणीपुरवठा होत होता. १९५२ ला हर्सूल तलावाचे बांधकाम सुरू झाले अन् ते पूर्ण झाल्यानंतर १९५४ ला शहराला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. गुरुत्वाकर्षणाने हे पाणी दिल्ली गेट कुंभात येत असे आणि तेथून गुरुत्वाकर्षणानेच पाणीपुरवठा होत होता. 


१९७१ शहराचा विकास झपाट्याने होऊ लागला. तेव्हा नवीन प्रकल्पाची गरज निर्माण झाली. म्हणून १९७१ ला जायकवाडी धरणातून ७०० मिलिमीटर व्यासाची वाहिनी टाकण्यात आली. त्यातून २८ एमएलडी पाणी येत असे. म्हणजे २० वर्षांत ही व्यवस्था करण्यात आली. पुढे पुन्हा मागणी वाढली. त्यामुळे बिडकीन येथे १९८५ मध्ये हौद तयार करून तेथून उपसा सुरू करण्यात आला. त्यामुळे आणखी २८ म्हणजेच एकूण ५६ एमएलडी पाणी शहरात येऊ लागले. 


१९७५ ते ८५ या दहा वर्षांत पाणी दुपटीने उपलब्ध केले. त्या काळात आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर असा औरंगाबादचा लौकिक होता. आणखी पाण्याची गरज निर्माण झाल्याने १९९१ ला १४०० मिमी व्यासाची वाहिनी टाकून १०० एमएलडी पाण्याची सोय केली. 


त्यानंतरच्या १६ वर्षांत ५६ एमएलडीवरून आपण थेट १५६ एमएलडीवर गेलो. मात्र १९९१ ते २०१८ या २७ वर्षांत आपण एकही प्रकल्प हाती घेऊ शकलो नाही. दुसरीकडे या काळात शहराची लोकसंख्या ५ वरून १५ लाखांच्या पुढे गेली. 

बातम्या आणखी आहेत...