आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प.च्या ३५०० शिक्षकांच्या बदल्या; ५५० शिक्षकांना बदलीचे ठिकाण मिळाले नाही, कोर्टात जाण्याचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हा परिषद शाळांमधील ३ हजार ५५० शिक्षकांच्या रविवारी रात्री बदल्या करण्यात आल्या. पाचशे पेक्षा अधिक शिक्षकांना बदलीसाठी जागा न मिळाल्याने आणि काही शिक्षकांना मनाजोगे गाव न मिळाल्याने पेच निर्माण झाला आहे. नियमबाह्य बदल्या केल्याचा आरोप करत शिक्षक संघटनांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. 


ग्रामविकास   विभागाने गतवर्षी राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने एकाच ठिकाणाहून करण्याचे जाहीर केले होते. मात्र, यास शिक्षकांनी तीव्र विरोध केला. परिणामी बदली प्रक्रिया थांबवावी लागली. यंदा शिक्षकांनी मोर्चा काढून चुकीचे निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने जुमानले नाही. टप्प्याटप्प्याने जिल्हानिहाय बदल्या होत आहेत. संवर्गनिहाय वर्गीकरण करून पोर्टलवर बदली इच्छुक शिक्षकांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. अर्जातील त्रुटी दूर करून एकाच ठिकाणी याद्या तयार करण्यात आल्या. त्यातून निकषानुसार बदली प्रक्रिया राबवण्यात आली. 


औरंगाबाद जिल्ह्यातील बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या रविवारी मध्यरात्री पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. सोमवारी सकाळपासून शिक्षणाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय बदली झालेल्या याद्यांची प्रिंट काढण्याचे काम सुरू केले. बदल्या झाल्याची वार्ता शिक्षकांना रात्रीच व्हॉट्सअॅप वरून कळली होती. सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात त्यांनी गर्दी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी आहेत. त्या परतल्यानंतर याद्यांची अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


५५० शिक्षक विस्थापित 
३५०० ते ४००० शिक्षक बदल्यांसाठी पात्र होते. त्यापैकी ३५०० हून अधिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. बदल्यांसाठी जे २० पर्याय दिले नव्हते, ते उपलब्ध न झाल्याने विस्थापित गटात मोडलेल्या शिक्षकांचा आकडा ५५० च्या वर आहे. या शिक्षकांना पोर्टल उघडून आता नवीन २० पर्याय भरून द्यावे लागणार आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडेल. मात्र, यापूर्वी त्यांनी भरून दिलेले गाव मिळाले नाही. आता लांब अंतराच्या गावी जाण्यास हे शिक्षक तयार नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...