आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Aurangabad : भरधाव कार डिव्हायडरला धडकली, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वाळूज औद्योगिक परिसरातून भरधाव औरंगाबाद शहराच्या दिशेने निघालेली कार  बुधवारी रात्री 11 वाजण्याचा सुमारास वळणावर असणाऱ्या डिव्हायडरला जोरात आदळल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. 

 

मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा रामभाऊ बुट्टे (40‌, रा. धावणी मोहल्ला, शहागंज, औरंगाबाद ) व त्यांचे साडू मनोज भालचंद्र   शेडुते (38, रा. जालना) हे या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. दरम्यान, दोघांना रात्री घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान बुट्टे यांचा रात्री 11.15 वाजता, तर शेडुते यांचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उर्वरित दोघे शिवाजी कुलथे (रा. वैजापूर.) व सुभाष रामचंद्र मुंडलिक ( रा. ठाणे) यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. 


बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास व्हेरॉक प्लँट-7 समोरील डिव्हायडरवर पांढऱ्या रंगाची कार जोरात आदळली. शांत असणाऱ्या परिसरात मोठा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने परिसरातील कामगारांनी धाव घेतली. चालकाच्या डाव्या बाजूने असणाऱ्या समोरील व मागील दोन्ही सीटवर असणारे व्यक्ती रक्तबंबाळ स्थितीत कारमध्ये फसून बसल्याचे बघ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिस हेड कॉन्स्टेबल सिद्दिकी,वडगावकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.  
 
अॅम्ब्युलंसला झाला उशीर
वारंवार 108 क्रमांकावर फोन करूनही वाहन वेळेत न आल्याने नाइलाजास्तव जमलेल्या नागरिकांनी उजव्या बाजूने असणाऱ्या चालकासह त्याच्या मागील व्यक्तीला कारच्या बाहेर काढून खासगी वाहनातून रुग्णालयात रवाना केले. दरम्यान, कारचा पत्रा वाकवून आतमध्ये अडकलेल्या दोघांची सुटका करत 108 रुग्णवाहिकेची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, उशिराने आलेल्या 108 क्रमांकाच्या वाहनातून गंभीर जखमींना घाटीच्या दिशेने तत्काळ रवाना करण्यात आले. मात्र, घाटीत पोहोचताच गंभीर जखमी बुट्टे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर शेडुते यांचा उपचारदरम्यान पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.  
 

बातम्या आणखी आहेत...