आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील जलसंधारणामुळे कृत्रिमरीत्या पाणी मुरवले जाणार; कायमची मिटू शकते समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भूगर्भतज्ज्ञ म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ.अशोक तेजनकर यांच्या अनुभवाचा फायदा आता विद्यापीठ परिसरातील वसाहतींनाही होणार आहे. डॉ.तेजनकर यांनी विद्यापीठ परिसराचे भूशास्त्रीय सर्वेक्षण केले असून येथील ३ बंधाऱ्यांची खोली, रुंदी वाढवणे आणि गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. डोंगरातून पडणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन न होता ते खडकाळ भागातही जमिनीत मुरवण्यासाठी तब्बल ६ बोअर घेतले जाणार आहेत. यामुळे भूजल पातळी वाढून त्याचा परिसरातील जलस्रोतांना फायदा होईल.

 

विद्यापीठाचा परिसर डोंगरांनी वेढला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. डोंगरावर कोसळणारे पावसाचे पाणी थेट विद्यापीठातील मोकळ्या मैदानात येते. मात्र, ते साठवण्याची सोय नसल्याने नाल्यावाटे वाहून जाते. हे पाणी साठवण्यासाठी कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांनी दोन वर्षांपूर्वी जलयुक्त विद्यापीठाची संकल्पना मांडली होती. त्यास तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांचे सहकार्य मिळाले होते. यानंतर काही खासगी संघटनांच्या सहकार्याने विद्यापीठात बंधारे बांधण्याचे काम करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाऊ लागले. मात्र, पाणी साठत असतानाही भूजल पातळी वाढत नव्हती. त्यासाठी प्रा.तेजनकर यांनी कृत्रिम उपाययोजना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

 

भूशास्त्रीय सर्वेक्षणातून उलगडले रहस्य : जमिनीखाली खडक आला तर पाणी पाझरत नाही. यामुळे विद्यापीठात नेमका कोठे खडक आहे, याचा शोध घेण्यासाठी प्र-कुलगुरूंनी परिसराचा भूशास्त्रीय अभ्यास केला. त्यातून प्रशासकीय इमारत ते सोनेरी महाल परिसरात पाणी पाझरत नसल्याचे समजले. तर लेणीखालील परिसर तसेच साई परिसरात पाणी लगेच जमिनीत मुरते. भावसिंगपुरा ते लेणीखाली मोठा खडक आहे. येथे पाणीपातळीत ७० फुटांचा फरक पडतो.

 

कृत्रिम पाझरण्यासाठी बोअर
खडकात पाणी पाझरण्यासाठी तेथे बोअर घेण्याचा पर्याय आहे. डॉ.तेजनकर यांनी अशी ६ ते ७ ठिकाणे शोधली असून तेथे लवकरच बाेअर घेतले जाणार आहेत. हे बोअर खडकाखाली ३० ते ४० फुटांवर असतील. यामुळे खडकावर पाणी पडल्यावरही ते बोअरवाटे जमिनीत जाईल. परिणामी विद्यापीठ परिसर, प्रामुख्याने मकबऱ्यामागील वसाहती पाणीदार होतील, असे डॉ. तेजनकर म्हणाले. तर विद्यापीठ परिसरातील ३ बंधाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांचे खोलीकरण, रुंदीकरण काम हाती घेण्यात आले आहे.

 

परिसराला फायदा
विद्यापीठाभोवतालच्या डोंगरावरून पडणारे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असतानाही खडकामुळे तेे जमिनीत मुरत नाही. त्याचे बाष्पीभवन होते. यामुळे भूजल पातळी वाढत नाहीय. परिणामी पाण्याची समस्या सतावते. त्यावर उपाय म्हणून खडकात ६-७ ठिकाणी बोअर घेणार आहोत. जमिनीत जाणारे पाणी नेमके कोठे जाईल सांगता येत नाही. तरी याचा विद्यापीठ परिसरातील वसाहतींना निश्चित फायदा होईल.
- प्रा.डॉ.अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...