आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'समांतर'पूर्ण होईपर्यंत डीएमआयसीच्या वाहिनीतून मिळू शकते मुबलक पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहराची गरज असलेल्या समांतर जलवाहिनीचे भिजत घोंगडे २०१५ पासून तसेच पडले आहे. याउलट २०१३ मध्ये शहरालगत डीएमआयसीची घोषणा झाली आणि आज घडीला दिवसाला ३०० एमएलडी पाणी देणारी वाहिनीही टाकून तयार झाली. यातून फक्त पाणी सोडणे बाकी आहे. महापालिकेच्या फारोळा शुद्धीकरण प्रकल्पासून हाकेच्या अंतरापर्यंत ही वाहिनी येऊन पडली आहे. ती जोडली तर समांतर प्रकल्प पूर्ण होईपर्यंत शहराला मुबलक पाणी मिळू शकते. सध्या डीएमआयसीमध्ये उद्योग आलेले नाहीत. म्हणजेच त्यांना तूर्तास पाण्याची गरज नाही. त्यामुळे येथील पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला तर पाणीबाणीतून सुटका होऊ शकते. 


समांतर जलवाहिनीचा प्रकल्प कोर्ट कचेरीत अडकल्याने तो कधी पूर्ण होईल, हे सांगणे अवघड आहे. दुसरीकडे शहराच्या पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ही गरज २०० एमएलडीच्या पुढे गेलेली असताना महापालिका १५० एमएलडी पाण्याचा दरदिवशी उपसा करते आणि त्यातील ११० एमएलडी पाणीच फक्त नागरिकांच्या घरात जाते. डीएमआयसीकडे प्रकल्प उपलब्ध आहे, परंतु त्यांना तूर्तास पाण्याची गरज नाही. तेव्हा त्यांच्याकडून तात्पुरत्या स्वरूपात त्यांचे पाणी मागितले तर ते मिळू शकेल. एक तर त्यांच्या वाहिन्या कार्यान्वित राहतील आणि शहराची तहानही भागेल. डीएमआयसीचे पाणी मिळू शकते, असे समजल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल व आयुक्त दीपक मुगळीकर यांनी ही कल्पना उचलून धरली आहे. 

 

गरज २०० एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्पाची 
डीडीएमआयसीची दररोज ३०० एमएलडी क्षमतेची जलवाहिनी फारोळ्यापर्यंत म्हणजे महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पापासून सुमारे ५ किमी अंतरावर टाकून पूर्ण आहे. फारोळा प्रकल्पाला जोडण्याएवढी जलवाहिनी महापालिकेला टाकावी लागेल. 


आपले पाणी 
२०० एमएलडी पाणी शहराची दररोजची गरज 
१५० एमएलडी मनपा करते दररोज उपसा 
१२० एमएलडीच पाणी लोकांच्या घरांत 


समांतरवर तोडगा निघावा म्हणून आ. सावे मुंबईत तळ ठोकून 
- समांतरचा तिढा तातडीने सुटावा यासाठी आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्याची मागणी करणारे आमदार अतुल सावे यांनी त्यांचे प्रयत्न सोडलेले नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा तिढा सोडवा, अशी मागणी करणार आहे. सेटलमेंट होत नसेल तर न्यायालयाला विनंती करून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जलवाहिनी टाकण्याची परवानगी मागण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी ते मुंबईत तळ ठोकून आहेत.
- समांतरमध्ये आणखी २०० एमएलडीचा प्रकल्प नियोजित आहे. तो युद्धपातळीवर तयार करवून घेतला तर ९ महिन्यात तयार होऊ शकेल. त्याव्दारे डीएमआयसीचे हे पाणी वापरता येईल. त्यामुळे दररोज पाणी देणे शक्य होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
- डीएमआयसीत सध्या उद्योग नाहीत. पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू होण्यास किमान ५ वर्षे लागतील. या काळात जलवाहिनीला वापराविना गंज लागण्याचा धोका आहे. त्यामुळे किमान पाच वर्षे ही जलवाहिनी शहरासाठी वापरता येईल. तोपर्यंत समांतरचा प्रकल्प मार्गी लागू शकतो. 


पर्यायाचे स्वागत 
'डीएमआयसीच्या जलवाहिनीतून पाणी घेण्याच्या पर्यायाचे स्वागत आहे. उद्योगमंत्री दिवाकर रावते, खासदार चंद्रकांत खैरे यांची मदत घेऊन हे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करू.' 
- नंदकुमार घोडेले, महापौर 


स्मार्ट सिटीत विषय मांडू 
'उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव तथा स्मार्ट सिटीचे मेन्टॉर सुनील पोरवाल यांच्याकडे लेखी मागणी करू. स्मार्टसिटीच्या बैठकीत हा विषय मांडू. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करू.' 
- दीपक मुगळीकर, मनपा आयुक्त