आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांत तीन वेळा नागरिक जलकुंभावर, मनपात फक्त बैठका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. चार दिवसांत दोन जलकुंभांवर तीन वेळा नागरिकांनी आंदोलन केले. त्यानंतरही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. भावसिंगपुरा, सिडको-हडको, साठेनगर, नंदनवन कॉलनी अशा अनेक भागांत सहा दिवसांनंतरही निर्जळी असल्याचे सोमवारी समोर आले. दुसरीकडे मनपा मुख्यालयात मात्र बैठकांचे सत्र सुरू होते. सकाळी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. उलट उपमहापौर विजय औताडे यांनी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल हे फोन उचलत नसल्याचे सांगत त्यांना शिवीगाळ केली. 


हडको-सिडको भागांसह जुन्या शहरात तसेच भावसिंगपुरा, बेगमपुरा आणि अन्य भागांत मोठ्या प्रमाणावर पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. जायकवाडी धरणात पाणी असूनही मनपाला शहरवासीयांची तहान भागवणे कठीण होऊन बसले आहे.


औताडे म्हणाले चरबी चढली का? 
पाण्याच्या आढावा बैठकीसाठी उपमहापौर विजय औताडे सभागृहात येताच त्यांना चहल दिसले. त्यांना बघून औताडे यांनी फोन का उचलत नाही? जास्त चरबी चढली का? अशा मस्तवाल भाषेत जाब विचारला. त्यावर चहल यांनी असे बोलू नका, चरबी नाही चढली, महापौरांकडे होतो, असे स्पष्टीकरण दिले. मात्र, औताडे ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे पाहून महापौरांनी मध्यस्थी करत औताडे यांचा हात धरून त्यांना खाली बसवले.


महापौर जलकुंभावर घालणार रात्रीची गस्त 
शहराच्या पाणी वितरणाची परिस्थिती जाणून घेण्यासह पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महापौर नंदकुमार घोडेले सोमवारी रात्रीपासून शहरातील सर्व जलकुंभांवर गस्त घालणार आहेत. सलग दोन दिवस गस्त घातल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून जायकवाडी ते फारोळा आणि फारोळा ते नक्षत्रवाडी दरम्यानच्या जलकुंभांची पाहणी करणार आहेत. 


जलवाहिनी फुटल्यामुळे भावसिंगपुऱ्यात निर्जळी 
हॉटेल देवप्रिया येथील ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी सोमवारी दुपारी साडेचार वाजता वेल्डिंगच्या ठिकाणी फुटली. त्यामुळे ही जलवाहिनी बंद करण्यात आली. याची दुरुस्ती सहा तास चालणार आहे. त्यानंतरच पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भावसिंगपुरा भागाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच ज्युबिली पार्क, विद्यापीठ, घाटी परिसर, हनुमान टेकडी येथील जलकुंभावर अवलंबून असलेल्या परिसरासह मिटमिटा, पडेगाव, बेगमपुरा आदी भागांत पाणी येणार नसल्याचे समोर आले. 


२० एमएलडी पाणी जाते कुठे, याचा शोध घ्या 
जायकवाडीतून १५६ एमएलडी पाणी उपसा करण्यात येतो. मात्र शहरात केवळ १३५ एमएलडी पाणी येते. एक एमएलडी पाण्याची गळती आणि ग्रामपंचायतीला वितरण गृहीत धरले तरी २० एमएलडी पाणी जाते कुठे, याचा शोध घ्या. तसेच ५ एमएलडी पाणी वाढवा, असे आदेश महापौरांनी दिले. 

बातम्या आणखी आहेत...