आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून मिळणार दोन दिवसांआड पाणी; नियोजन अखेर अंतिम टप्प्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील नागरिकांनी दोन दिवसाआड पाणी मिळावे, अशी नगरसेवकांनी लावून धरलेली मागणी अखेर पावसाळा सुरू झाल्यानंतर मान्य होत आहे. शनिवारपासून शहराच्या सर्व भागाला दोन दिवसांआड पाणी मिळणार आहे. याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले असून, तसे जाहीर प्रगटन गुरुवारी जारी करण्यात आले. 


सध्या शहराच्या काही भागाला तीन दिवसांआड, तर काही भागाला चार दिवसाआड पाणी देण्यात येत असल्याचे या विभागाच्या वतीने अधिकृतपणे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अनेक भागांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत होते. त्यामुळे शहराच्या सर्व भागातून ओरड होत होती. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती अशा दोन्हीही सभागृहांमध्ये किमान तीन दिवसांआड पाणी द्या, असे आदेश देण्यात आले होते. परंतु ते शक्य झाले नाही. प्रभारी आयुक्त असताना जिल्हाधिकाऱ्यांनीही असे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाने तीन दिवसाआड पाणी देऊ अशी भूमिका घेतली होती. तेव्हा दोन दिवसांआड पाणी द्या, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्वसाधारण सभेत दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. 


अभियंता वैद्यांनी लढवली शक्कल 
आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीही दोन दिवसांआड पाणी देणे शक्य नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, अभियंते असलेले स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी आयुक्तांशी चर्चा केली. दोन दिवसांआड पाणी देणे कसे शक्य आहे, हे पटवून दिले आणि त्यानंतर आयुक्तांना तसे आदेशही दिले. पाणीपुरवठा विभागाकडून शनिवारपासून याची अंमलबजावणी होणार असली तरी सर्व सुरळीत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. 


नागरिकांना पाणी जपूनच वापरावे लागणार 
शहरात आजही १२५ ते १३५ एमएलडी पाणी येते. उन्हाळ्यातही तेवढेच येत होते. त्यामुळे एवढ्याच पाण्यात जेव्हा पाच दिवसांनंतर पाणी मिळत होते तर आता दोन दिवसांआड कसे, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्याचे उत्तर मिळणाऱ्या पाण्यात दडले आहे. आजघडीला किमान ४५ मिनिटे पाणी येते. परंतु आता हेच पाणी दोन दिवसांनी फक्त ३० मिनिटे पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपूनच वापरावे लागेल. 


भर उन्हाळ्यातही शक्य होते 
भर उन्हाळ्यातही दोन दिवसांआड पाणी देणे शक्य होते. परंतु त्याचे तांत्रिक नियोजन केले गेले नाही. या वेळी मी ते आयुक्तांना पटवून दिले. त्यामुळे दोन दिवसांआड पाणी देणे शक्य झाले. सर्व शहराला दोन दिवसांआड पाणी मिळण्यास काही दिवसांचा अवधी लागेल. 
- राजू वैद्य, सभापती, स्थायी समिती 


आजचे चित्र 
सध्या शहर व सिडको परिसराला तीन दिवसांआड, तर दिल्ली गेट कुंभावरून पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला चार दिवसांआड पाणी मिळते. 


सोमवारी होईल वेळापत्रक जारी 
दरम्यान, येत्या सोमवारी सविस्तर वेळापत्रक जारी केले जाईल. कोणत्या भागाला कधी आणि किती वाजता पाणी येईल, याची माहिती त्यात असेल. 

बातम्या आणखी आहेत...