आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- जायकवाडीतून दररोज शहरात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिले आहेत. पाणीपुरवठ्याची वेळ अर्धा ते पाऊण तास केल्यास दोन दिवसांआड पाणी देणे शक्य आहे. मात्र, मनपाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पुण्याहून आलेल्या पाणबुड्यांनी रविवारी पंपगृहात अडकलेले शेवाळ काढले. यामुळे शहराकडे येणाऱ्या पाण्यात वाढ होणार आहे.
पदाधिकारी आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या तगाद्यामुळे शक्य नसतानाही पाणीपुरवठा विभाग दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करत आहे. सद्य:स्थितीत कुठे तीन तर कुठे चार दिवसांआड एक तास पाणीपुरवठा होत आहे. दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी काही भागांत अर्धा तर काही भागांत पाऊण तास पाणी देण्याचे नियोजन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यंदा उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन बिघडल्याने नागरिकांनी जलकुंभांवर आंदोलन करून नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना घेराव घातला होता.
भाजपच्या नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्याच दालनात मुक्काम ठोकला होता. तेव्हा तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पाणीपुरवठा विभागाने केलेल्या दाव्यानुसार तीन दिवसांआड समान पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आठच दिवसांत शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला. तो आजपर्यंत सुरू आहे. मात्र, पुन्हा पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नगरसेवक, नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या सूचनेवरून दहा दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाला आठ दिवसांत दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. संपूर्ण शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या वेळा कमी केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पूर्वी सिडकोसह निम्म्या शहराला दोन दिवसांआड तर जुन्या शहरासह उर्वरित शहरात तीन ते दोन दिवसांआड पाणी दिले जायचे. त्यावेळी पाऊण ते एक तास पाणीपुरवठा केला जायचा. आता सर्वत्र दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या वेळेत कपात करावी लागणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली.
तीन पाणबुड्यांनी काढला जायकवाडीतील गाळ
मनपाने रविवारी पुणे येथील तीन पाणबुडे बोलावले होते. त्यांनी पाच तास दोन पंपाजवळील शेवाळ काढले. मात्र काही शेवाळ तेथेच काढून टाकल्याने नेमके किती शेवाळ काढले याची माहिती मनपाकडे नाही. तसेच किती पाणीपुरवठा वाढेल याचीही आकडेवारी प्रशासनाकडे नाही. जायकवाडीचे दोन्ही पंप पूर्वीच्या क्षमतेने पाणी उपसा करत असल्याने एक एमएलडी पाणी वाढणार आहे.
दररोज १२८ एमएलडी पाणी
शहरात दररोज १२८ एमएलडी पाणी येेते. यातून काही भागांत दोन तास तर काही भागांत एक तास पाणीपुरवठा करण्यात येतो. सर्व शहरात अर्धा ते पाऊण तास पाणी दिल्यास दोन दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे. यासाठी आधी जुन्या शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागेल.
७ एमएलडी पाणी आवश्यक
दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी १३५ एमएलडी पाणी आवश्यक आहे. मात्र त्यासाठी अजून सात एमएलडी पाण्याची अावश्यकता आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात १३५ एमएलडी पाणी येत होते. आता १२८ एमएलडी पाणी येते, उर्वरित पाणी जाते कुठे? याचा शोध घेणे आवश्यक आहे. पाणी चोरी वाढल्याचे विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.