आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांनी मिळेल, पण कमीच असेल येणारे पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सर्व शहराला दोन दिवसांआड पाणी द्या, असे आदेश आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी जारी केले. त्यानुसार वेळापत्रक तसेच नियोजनाच्या कामात पाणीपुरवठा विभाग गुंतला आहे. मुळात येणारे पाणी कमी आणि तेच दोन दिवसांनी द्यायचे झाल्यास पाण्याच्या वेळेत कपात हाच पर्याय असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे जर यापुढे तीनऐवजी दोन दिवसांआड पाणी आले तर त्याची वेळ ही ४५ मिनिटांपेक्षा कमी असेल. अर्थात हा निर्णय अजून अंतिम झालेला नाही. परंतु पाण्याच्या वेळेत आणि प्रमाणात कपात केल्याशिवाय दोन दिवसांआड पाणी देणे शक्य नाही, यावर अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. 


आता जर पाण्याच्या वेळेत म्हणजेच पाण्याच्या प्रमाणात कपात केली तर नगरसेवक तसेच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार हे नक्की आहे. त्यामुळे हा निर्णय घेत असताना या अधिकाऱ्यांचे 'पाणी पाणी' होतेय. 


दोन दिवस पुरेल एवढे पाणी मिळावे

पुरेशा दाबाने ३० मिनिटे पाणी मिळाले तरी ते दोन दिवस पुरते. परंतु ते तेवढ्या दाबाने मिळायला हवे. आता ४५ मिनिटे पाणी येते, परंतु त्यातील पहिले २० मिनिटे तर पाणी आल्याचे कळतच नाही. त्यानंतर त्याला काही मिनिटे दाब असत नाही आणि शेवटी पाणी भरण्यास सुरुवात झाली की ४५ मिनिटे पूर्ण होतात. त्याऐवजी ३० मिनिटे पुरेशा दाबाने पाणी दिले तरी चालेल, परंतु दोन दिवस एका कुटुंबाला पुरेल एवढे पाणी नळातून यायला हवे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 


अधिकाऱ्यांचे 'पाणी पाणी' 
दोन दिवसांआड पूर्ण शहराला पाणी द्या, असे आदेश देऊन आयुक्त मोकळे झाले, परंतु हे पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न या विभागातील अधिकाऱ्यांना पडला. कारण पाणी आणायचे कुठून, असा प्रश्‍न आहे. जायकवाडी धरणातील पाणी पातळी दिवसेंदिवस घटत असल्याने महापालिकेच्या विद्युत पंपात शेवाळ, गवत अडकत आहे. त्यामुळे पाच एमएलडी पाणी उपसा कमी झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांआड पाणी द्यायचे असेल तर सध्या ४५ मिनिटे पाणी सोडण्यात येते. याचा कालावधी दहा ते पंधरा मिनिटांनी कमी करावा, अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली आहे.