आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नाशीनंतर स्वत: केला योगाभ्यास; शहर रोग, तणावमुक्त करण्याच्या ध्यासातून घडवले दीडशे योग शिक्षक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैरंगाबाद- पन्नाशी जवळ येताच निवृत्तीचे वेध लागतात. आयुष्य दगदगीत व्यतीत केल्यानंतर पुढील काळ आरामात जगण्याचे बेतही आखले जातात. परंतु, श्रीयश इंजिनिअरिंगचे संचालक उत्तम काळवणे यांनी पन्नाशी उलटल्यावर स्वत: योगाभ्यास केला. विशेष म्हणजे, निरोगी जीवनाचा हा योगमार्ग सामान्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी मोफत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने योगा शिकवण्यासाठी प्रशिक्षण वर्गही सुरू केला. त्यांनी गत तीन वर्षांत ३५ ठिकाणी असे वर्ग सुरू करून १५० योग शिक्षकही घडवले आहेत. शहर रोगमुक्त आणि तणावमुक्त करण्याच्या ध्यासातून ते आजही सकाळी पाच ते आठ हे तीन तास योगाचे धडे देत आहेत. 

 

पुण्यातील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्यपदी असताना त्यांनी योगाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर काळवणे यांनी ८ मार्च २०१५ रोजी सिद्धार्थ उद्यान आणि ज्योतीनगरात मोफत योगवर्ग सुरू केले. ज्या भागातील रहिवासी योगाभ्यासासाठी इच्छुक आहेत, तिथे स्थानिकांशी संवाद साधत काळवणे सर्वेक्षण करतात. किमान ३० जणांनी नियमितपणे प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवली की ते शिबिर सुरू करतात. भारतीय योग संस्थानच्या माध्यमातून ते सकाळी साडेपाच ते साडेसात असे दोन तास योगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणादरम्यान ३० पैकी ५ जणांना योग शिक्षक बनवले जाते. पुढे तेच इतरांना योगाचे धडे देतात. आगामी दोन वर्षांत शहरात १०० योगवर्ग सुरू व्हावेत, यासाठी काळवणे प्रयत्न करत आहेत. 


दोन तासांत ४० आसने, १५ प्राणायाम, बारा मुद्रांचे प्रशिक्षण : या योगा वर्गात ४० वेगवेगळी आसने शिकवली जातात. तसेच पंधरा प्राणायाम आणि बारा मुद्रांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये प्रत्येकाला त्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान आणि त्यामधून मिळणारे फायदे सांगितले जातात. भारतीय योग संस्थानच्या वतीने मोफत प्रशिक्षण दिले जाते. 


तणावमुक्त झालो 
वर्षभरापासून योग शिक्षक म्हणून कार्यरत आहे. जेवण, झोपेवर नियंत्रण आले. पाठदुखी थांबली. शेअर ट्रेडिंगसारख्या व्यवसाय असतानाही योगामुळे तणावमुक्त वाटते. 
- कैलास जाधव, योग शिक्षक 


पुन्हा चालता आले 
 माझे ६७ वर्षे वय असून पूर्वी चालताही येत नव्हते. कंबरदुखीचा त्रास होता. मात्र, वर्षभरापासून योगामुळे हा त्रास कमी झाला. आता मी दुचाकीही चालवतो. मधुमेहही नियंत्रणामध्ये आला आहे. 
- के. बी. चिकटे, प्रशिक्षणार्थी 

बातम्या आणखी आहेत...