आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था, 20% मुले गणितात शून्य, वाचताही येईना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे गोडवे गाणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात प्राथमिक शिक्षणाचा दर्जा पुरता घसरला आहे. औरंगाबादमधील २० टक्के मुलांना गणित जमत नाही. वाचता येत नाही. विशेष बाब म्हणजे पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यास पहिलीचे पुस्तक वाचता येत नाही. मग तो पाचवीत कसा, असा सवाल खुद्द शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाच पडला अाहे. हे विदारक चित्र बदलण्यासाठी आता स्वतंत्र उपक्रम हाती घेत "अध्ययन पूरक कृती उपक्रम' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक तज्ज्ञ असावेत, यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरणांतर्गत शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही देण्यात येत आहे. असे असले तरी एका पाहणीत औरंगाबादमधील २० टक्के असे विद्यार्थी आढळून आले आहेत, जे चौथीच्या वर्गात शिकतात परंतु त्यांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नाही. ही मुले गणितातही कच्ची आहेत. 


या मुलांना शिक्षकांनी शिकवलेले समजते का? ते नियमित शाळेत येतात का? येत नाहीत तर कारण काय? त्या मुलांना शिक्षणाची गोडी लावणे, शाळेत आणण्याबरोबरच त्यांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी शिक्षक कमी पडत आहेत का? हे शिक्षकांनीच शोधून काढायचे आहे. त्यासाठी शिक्षकांना ३१ मार्चपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. मुलांना गणित, वाचता यावे यासाठी शिकवण्याच्या पद्धतीत बदल करा, असा सल्ला शिक्षण विभागाने दिला आहे. यासाठी "स्वतंत्र अध्ययन पूरक कृती उपक्रम' हाती घेण्यात आला आहे. 


असा राबवणार उपक्रम 
ज्या २० टक्के मुलांना वाचता येत नाही, त्यांना शाळेत नियमित येण्यासाठी उपाय करायचे आहेत. त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवणे, खेळ, कथा, गोष्टी, प्रात्यक्षिकाचा वापर करायचा आहे. उदा. गव्हातून खडे बाजूला करा, एकाग्रता वाढवण्यासाठी विविध रंगांची खेळणी बाजूला करा आदी. 


हा उपक्रम शिक्षकांसाठीही 
शिक्षकांनी त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर प्राथमिक शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी शिक्षकांसाठीदेखील आहे. ३१ मार्चपर्यंत मुलांना वाचता यायला हवे, असे अपेक्षित आहे. 
- डॉ. सुभाष कांबळे, संचालक , प्रादेशिक विद्या प्राधिकरण 

बातम्या आणखी आहेत...