आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही फुटेजमुळे सापडले 12 दुकाने फोडणारे 3 अल्पवयीन चोरटे, गुन्हे शाखेची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गारखेड्यासह पुंडलिकनगर, जवाहरनगर परिसरात धुडगूस घालत दुकानांचे शटर उचकावून चोऱ्या करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. या टोळीतील एक जण फरार झाला आहे. तिघांनी ३१ डिसेंबर आणि सात जानेवारीच्या रात्री १२ दुकाने फोडल्याची कबुली दिली. दुकानातील सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले होते. त्यांनी पुन्हा चोऱ्या करू नयेत म्हणून पोलिस त्यांचे समुपदेशन करणार आहेत.

 

गेल्या महिनाभरापासून अल्पवयीन चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. विविध ठिकाणी चोरी करताना ते सीसीटीव्हीत कैद झाले होते. पण त्यांचा शोध लागत नव्हता. अखेर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना हे चोरटे सूतगिरणी चौकात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यावरून धोंडे यांच्यासह जमादार संतोष सोनवणे, पोलिस नाईक बापूराव बावस्कर, शिपाई आनंद वाहूळ, विकास गायकवाड आणि रितेश जाधव यांनी सापळा रचून तिघांना पकडले. त्यापैकी १७ आणि १३ वयोगटातील दोघे काबरानगरातील आहेत, तर १४ वर्षांचा मुलगा हिंमतनगरातील रहिवासी आहे. त्यांच्याकडून चार हजार ३०० रुपये पोलिसांनी जप्त केले.

 

२७ डिसेंबर रोजी या चौघांनी मिळून विभागीय क्रीडा संकुलासमोरील चार दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना एका गिफ्ट शॉपीमध्ये २५ हजार रुपये मिळाले. त्यानंतर सात जानेवारीच्या रात्री पहाटे तीन वाजेनंतर त्यांनी सात दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना लॉटरीचे दुकाने फोडण्यात यश आले. तेथून ४६ हजार रुपये चोरले. याच दिवशी त्यांनी चार चायनीजची दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला, तर एका किराणा दुकानात ठेवलेला गोशाळा देणगीचा डबा चोरला. या टोळीने १२ दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना दोन दुकाने फोडण्यात यश मिळाले. मागील महिन्यातदेखील याच भागात सात ते आठ दुकाने फोडण्यात आली. त्यात या टोळीचा काही सहभाग आहे का याचाही पोलिस तपास करत आहेत.


खबऱ्याने दिली माहिती
सात जानेवारी रोजी रात्री या तिघांनी मिळून लॉटरीचे दुकाने फोडले होते. त्यात त्यांना ४६ हजार रुपये मिळाले. मात्र या दुकानात सीसीटीव्ही असल्याने त्यात चोरीची घटना चित्रित झाली. या फुटेजचा आधार घेत पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांना कामाला लावले. टोळीतील तिघे सूतगिरणी चौकात असल्याची माहिती धोंडे यांच्या पथकाला मिळताच त्यांनी तिघांना ताब्यात घेतले.


आई-वडिलांना कल्पनाच नाही
ताब्यात घेतलेली तिन्ही मुले सामान्य घरातील आहेत. त्यांची आई धुणीभांडीचे काम करते, तर वडील रद्दी गोळा करतात. आपली मुले दिवसभर काय करतात हेच त्यांना माहीत नव्हते. पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले. या मुलांमध्ये शाळेची गोडी निर्माण करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत असल्याची माहिती उपनिरीक्षक योगेश धोंडे यांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...