आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणातील अति पावसामुळे राज्य सरप्लस; आतापर्यंत महाराष्ट्रात 30% जास्त पाऊस, ९ जिल्ह्यांत तूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कोकण, मुंबईत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला असताना जुलैचा दुसरा आठवडा उजाडला तरी राज्यातील ९ जिल्ह्यांत पावसाची तूट अाहे.  उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाला आहे. औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा, गोंदिया, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत पावसाने जून ते ९ जुलैपर्यंतच्या अपेक्षित पावसाची सरासरीही अद्याप गाठलेली नाही. याउलट नांदेड, नागपूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यांत या काळात अतिपावसाची नोंद झाली आहे. मुंबई-कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात आतापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत ३० टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.  दरम्यान, पुणे वेधशाळेने १० ते १३ जुलै या काळात राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.   


हिमालयाच्या कुशीत गेलेला मान्सूनचा आस (ट्रफ) आता दक्षिणेकडे सरकून सामान्य स्थितीत आल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. अायएमडीनुसार, सध्या देशात हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि गुजरात राज्य आणि आसपासच्या क्षेत्रात चक्रवात स्थिती निर्माण झालेली आहे.


या आठवड्यात चांगला पाऊस
कर्नाटक -केरळच्या किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून ते १३ जुलैपासून अधिक तीव्र होईल. त्यामुळे मध्य आणि दक्षिण भारतात या आठवड्यात मान्सून  सक्रिय होऊन चांगला पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.


६ जिल्हे अति पावसाचे
पालघर, ठाणे, मुंबई, उपनगर, नांदेड, नागपूर .

 
२२ जिल्हे सरासरी, त्याहून जास्त पाऊस
मुंबई, शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ .


९ जिल्ह्यांत पावसाची तूट
धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, सांगली, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, गोंदिया.
(स्रोत : आयएमडी, एक जून ते ९ जुलैपर्यंतच्या पावसाच्या नोंदीनुसार)


मुंबई- ठाण्यात मुसळधार, शाळा- महाविद्यालयांना सुटी
सलग तिसऱ्या दिवशी पडलेल्या मुसळधार पावसाने साेमवारी मुंबई, ठाणेकरांची  दाणादाण उडवली. रविवारी रात्रीपासून सुरू राहिलेल्या काेसळधारेने मुंबई अाणि उपनगरांना झाेडपून काढले. वसई, नालासाेपारा, विरार या भागात पूरजन्य स्थिती निर्माण हाेऊन अनेकांच्या घरात पाणी शिरले. ठिकठिकाणी साचलेले पाणी, वाहतूक काेंडी अाणि रेल्वेचा खाेळंबा यामुळे मुंबईकरांचे जीवन विस्कळीत झाले. त्यामुळे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना साेमवारी सुटी देण्यात अाली.  सर्वाधिक २३२.५० मिमी पावसाची नोंद वसई तालुक्यात झाली. मुंबईत १७०, ठाण्यात ७४.७६ तर रायगडमध्ये ११३ मिमी पाऊस झाला.


यवतमाळ : दोन घटनांमध्ये तिघे वाहून गेले
रविवारी पुसद तालुक्यात नदीच्या पुरात दोन जण, तर वणी तालुक्यातील पेटूरच्या नाल्यात १ जण वाहून गेला. गेल्या २ दिवसांपासून जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. बान्सी नदीचा पूर पाहण्यासाठी गेलेल्यांपैकी दोघेजण पाण्यात पडून वाहून गेले. दुसऱ्या घटनेत नाल्यावर अंदाज न आल्याने पुलावरून युवक वाहून गेला.

बातम्या आणखी आहेत...