आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादकरांनी रात्रभर जागून केली शहरात अडकलेल्या भाविकांची मदत, तासाभरात पोहोचवले जेवण, पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सोशल मीडियाचा विधायक कामासाठी वापर केला तर अवघ्या काही तासांत लाखो लोकांपर्यंत मदत पोहोचवता येते, याची प्रचिती सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर लिंबेजळगाव येथील इज्तेमासाठी देशभरातून आलेल्या भाविकांनी घेतली. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास जेवण, पाण्यासाठी भाविकांचे हाल सुरू असल्याची पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल झाली. त्यानंतर अवघ्या तासाभरात शहरातील नागरिकांनी जेवण, पाणी, फळे घेऊन रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर धाव घेतली. वाहने न मिळाल्याने हजारो भाविक सुमारे २४ तास शहरात थांबून होते.

 

तीनदिवसीय इज्तेमाचा सोमवारी दुपारी समारोप झाल्यानंतर पायी येणारे भाविक दुपारी चारनंतर शहरात दाखल झाले. रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती, सिडको बसस्थानकात एकाच वेळी दाखल झालेल्या भाविकांसाठी कोठेही जेवणाची व्यवस्था नव्हती. कारण इज्तेमामुळे शहरातील बहुतांश हॉटेल बंद होती. २० ते २५ किमी चालून थकलेले वृद्ध पाणी जेवण न मिळाल्याने व्याकूळ झाले होते. त्यांच्यासाठी इज्तेमाच्या स्वयंसेवकांनी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ च्या मालधक्क्यावर जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र, भाविकांची संख्या हजारोंच्या घरात असल्यामुळे येथील खाद्यपदार्थ लगेच संपले. ही माहिती सोशल मीडियावरून व्‍हायरल झाली. त्‍यानंतर शहरातील तरुणांनी जमेल तेथून खाद्यपदार्थ, पाणी मिळवून ते गर्दीच्‍या ठिकाणी रवाना केले.

 

विनापरवानगी बाळगली कार्बाइड गन : उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद येथून इज्तेमासाठी आलेल्या सरपंचाच्या सुरक्षेसाठी विनापरवानगी कार्बाइड गन, चाकू आणि एअर गन बाळगलेल्या पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आले. दोन दिवसांपासून त्याला वाळूज पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. सोमवारी अलाहाबाद पोलिस अधीक्षकांनी त्याला निलंबित कले.

 

रात्री १२ नंतर उघडली दुकाने अाणि हॉटेलही
सोमवारी मुस्लिमबहुल भागातील सर्व दुकाने, हॉटेल बंद होती. मात्र, भाविकांना जेवणाची आवश्यकता असल्याचे समजताच अनेकांनी हॉटेल, दुकाने उघडून खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या दिल्या. महिलांनी रात्रभर जागून घरी जेवण बनवून दिले. तरुणांनी वर्गणी करून फळे, खाद्यपदार्थ भाविकांपर्यंत पोहोचवली.  


दुसऱ्या दिवशी दुपारनंतर फुटली नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी
इज्तेमातून सोमवारी दुपारी बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी दुसऱ्या दिवशी फुटली. सोमवारी दिवसभर वाळूज, पंढरपूरसह नगर, पुणे आणि बीड बायपास या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

 

लिंबेजळगाव येथे इज्तेमासाठी आठ लाख वाहने दाखल झाली होती. सोमवारी दुपारी दुआनंतर भाविक परतीच्या मार्गावर निघाले. भाविक आणि वाहनांची संख्या लाखात असल्याने औरंगाबाद-अहमदनगर महामार्ग ठप्प झाला. पहिल्या टप्प्यात पायी जाणारे, नंतर दुचाकी व त्यानंतर कार, बस, ट्रक ही वाहने सोडण्यात आली. सोमवारच्या दुपारी एक वाजल्यापासून ते मंगळवारच्या दुपारी एकपर्यंत रस्त्यांवर इज्तेमाची वाहने सुरूच होती. लिंबेजळगाव येथून निघालेल्या वाहनांना पोलिसांसह, स्वयंसेवक रस्ता मोकळा करून देत होते. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सी.डी. शेवगण यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या मदतीची प्रशंसा केली.

 

मंगळवारीही सकाळपासूनच खाद्यपदार्थ, पाणी वाटप सुरू होते. रोशन गेट, कटकट गेट, सिटी चौक, बुढीलेन, आझाद चौक आदी भागातून जेवण पाठवण्यात आले. अखेर दुपारी ३ वाजता जेवण पाठवू नका, जास्त झाले असे सांगावे लागले.

 

मध्यरात्रीपर्यंत मदत करून स्वयंसेवक घरी परतले
रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर पहाटे पाच वाजेपर्यंत मदतीचा ओघ सुरूच होता. खाद्यपदार्थ घेऊन आलेली अनेक वाहने लिंबेजळगाव, नगर नाका, वाळूज, कांचनवाडी येथे पाठवण्यात आली. सर्व भाविकांपर्यंत जेवण, पाणी पोहोचल्याची खात्री झाल्यानंतर स्वयंसेवक घरी परतले.

बातम्या आणखी आहेत...