आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

39 व्या दिवशीही कचरा खाली-वर करणे सुरू, अद्यापही शहरात पाच हजार टन कचरा पडून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरामधील कचराकोंडीच्या ३९ व्या दिवशीही महानगरपालिकेकडून कचरा केवळ खाली-वर करण्याचे काम सुरू होते. यामुळे अद्यापही एक हजार टन कचरा पडून असल्याचा खुलासा प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला. प्रत्यक्षात मात्र शहरात पाच हजार टनांहून अधिक कचरा तसाच पडून आहे.


शहरात साचलेला कचरा प्रशासनासाठी मोठे संकट बनले आहे. कचरा टाकण्यासाठी मनपाकडे जागा नसल्याने मिळेल त्या जागेत कचरा जशाच्या तसा पुरण्यात येत आहे. दुसरीकडे, कचऱ्यावर काही ठिकाणी कंपोस्टिंग होत असली तरी रोजच्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास मनपाला अपयश आले असल्याचेही राम यांनी कबूल केले. असे असले तरी नियमित प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला. ओला कचरा बऱ्यापैकी मुरवत असलो तरी सुका कचरा डोकेदुखी आहे. त्यासाठी पर्याय शोधत असल्याचे राम यांनी सांगितले. कचरा संपवण्यासाठी आम्ही डीपीआरनुसार काम करत असल्याची माहिती महापौर घोडेले यांनी सांगितले. 


रात्रपाळीत कचरा उचलणार

आज सकाळी सेंट्रल बसस्टँड, शहागंज बसस्टँड, आकाशवाणी, गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रोडची पाहणी राम यांनी केली. त्या वेळी आकाशवाणी भिंतीलगतच्या कचऱ्यावर येथेच प्रक्रिया करा, पुंडलिकनगर रोडवरचा कचरा रात्री उचला, कंपोस्टिंग करा, असे आदेश त्यांनी दिले. ऋषिकेश मेडिकलचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल त्यांना पाच हजार रुपये दंड करण्यात आला. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेता 


मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला प्रक्रिया सुरू 
मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. त्यावर नाशिकच्या कंपनीकडून प्रक्रिया करण्यात येत आहे. पूर्वी कचऱ्याचा पिरॅमिड करून त्यावर औषध फवारणी केली होती. आज तो कचरा खाली-वर करून पुन्हा औषध टाकण्यात आल्याचे राम यांनी सांगितले. 


पावसाळ्यापूर्वी नियोजन नसेल तर संकट 
मनपाकडे दोन महिने असून या काळात म्हणजेच एक जूनपर्यंत कचरा निर्मूलनाची सर्व कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. या दोन महिन्यांत सर्व कामे केली नाहीत त, ही कचराकोंडी आपत्ती बनू शकते. त्यामुळे आम्ही वेगाने कामाला लागलो आहोत. त्यानुसार काम सुरू आहे. 


१५ एप्रिलपर्यंत शेड उभारणार 
सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी मशीन लावण्यात येणार आहेत. त्याची जागा निश्चिती सुरू आहे. सध्या अडचण नाही, पण पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून तेथे शेड टाकण्यात येणार आहे. हे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करणार आहे. 


१२ टन सुका कचरा अंबुजा कंपनीला 
सध्या कचऱ्याचे वर्गीकरण सुरू आहे. सुक्यामधील विक्री होणारा कचरा वेचक घेऊन जात आहेत. मात्र, विक्री न होणारा १२ टन कचरा अंबुजा सिमेंट कंपनीला दिला जाणार असून याबाबत वाळूजमधील कंपनीशी चर्चा सुरू आहे. सुका कचरा अडचण असून तो साठवण्यासाठी मनपाच्या पडीक इमारतींचा शोध घेण्यात येणार आहे. 


प्लास्टिक बंदीला लागेल एक महिना 
शहरात प्लास्टिक बंदी घोषित केल्याबरोबर लगेच प्लास्टिक येणे बंद होणार नाही. त्यासाठी किमान एक महिना अवधी लागणार आहे. दरम्यान, मोठे विक्रेते आणि उत्पादकांची बैठक घेण्यात येणार असून प्लास्टिकला पर्याय शोधावा लागणार आहे. त्यासाठी कागद, ज्यूट, कापडाचा पर्याय उपलब्ध करणार. ज्यांच्याकडून सहकार्य मिळणार नाही, अशांवर दंडात्मक कारवाई होईल. कचरा फेकणाऱ्या व जाळणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचे राम म्हणाले.