आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० वर्षांत औरंगाबाद मनपाचे १५ कोटी गाळात गेले तरी नाल्यांचा जीव कोंडलेलाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील नाल्यांतून गाळ काढण्यासाठी महापालिकेने दहा वर्षांत १५ कोटी रुपये खर्च केले आहेत. यंदा पावणेदोन कोटींचा खर्च होणार आहे. एवढे होऊनही गाळ तसाच राहतो. कारण गाळ काढण्यासाठी निविदा काढण्याची वेळ चुकते नव्हे, ती ठरवून चुकवली जाते. गाळ काढण्याची वार्षिक निविदा पावसाळा संपल्यानंतर काढून दिवाळीपूर्वी काम सुरू झाले तरच सर्व नाल्यांतील गाळ निघू शकतो. 


ठेकेदाराचा फायदाच फायदा
नाल्यातून गाळ काढून तो अन्यत्र नेऊन टाकण्याची निविदा असते. प्रत्यक्षात ठेकेदार फक्त गाळ काठावर आणून काढतो अन् नंतर तो गाळ पुन्हा नाल्यात जातो. त्यामुळे ठेकेदाराचा फायदाच फायदा आहे. तो असा. गाळ काढण्यासाठी जेसीबी लावावे लागते. तुलनेने त्याचा खर्च कमी असतो. निविदेमध्ये त्यापेक्षाही जास्त खर्चाची तरतूदही तो गाळ वाहून नेण्यासाठी केलेली असते. त्यामुळे निम्म्यापेक्षाही कमी खर्चात ठेकेदाराचे काम फत्ते होते. इकडे ठेकेदाराला निम्म्याहून कमी खर्च आला आहे, याची कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना असते. त्यामुळे ठेकेदाराबरोबर अधिकाऱ्यांचाही फायदा अन् गाळ पुन्हा नाल्यात उतरल्याने पाणी नागरिकांच्या घरात, अशी ही लोकशाही आहे. एकाच वेळी अनेक ठेकेदारांना काम दिले जाते. परंतु बारमाही ठेक्यात एकाच ठेकेदाराला हे काम देता येईल, त्याला जबाबदार धरले जाईल. मला मिळालेल्या कामाच्या ठिकाणचा गाळ मी काढला होता. परंतु वर काम करणाऱ्या ठेकेदाराने काम व्यवस्थित न केल्याने तो वाहून आला, असे लेखी उत्तर आजघडीला ठेकेदार देतात. ते बारमाही निविदेत देता येणार नाही. त्याचबरोबर गाळ फक्त पावसाळ्यापूर्वीच काढायचा असतो, असा समज मुद्दाम पसरवून देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात गाळ दिसत असला तरी नागरिक तक्रार करत नाहीत. परंतु बारमाही प्रक्रियेत ते तक्रार करतील अन् वेळीच तो गाळ उचलून नेता येऊ शकेल. अनेक ठेकेदारांना मिळून महापालिका पावणेदोन कोटी देणार आहे अन् ही रक्कम गाळातच जाणार आहे. तेव्हा वार्षिक दोन कोटी दिले तरी चालतील, पण वर्षभरात सर्व नाले मोकळे करण्याचा निर्णय घेतला तर नाले मोकळे होतील हे नक्की. 


का फसते नाले सफाई? 
नाले सफाईच्या निविदा एप्रिलमध्ये तरी निघाव्यात, असे अपेक्षित असते. परंतु त्या मे महिन्यात निघतात आणि मे महिन्याच्या शेवटी नाल्यांतील गाळ काढून तो काठावर ठेवला जातो. तोच पाऊस सुरू होतो आणि काठावरील गाळ पुन्हा नाल्यात उतरतो. त्यामुळे ही नालेसफाई दरवर्षी अयशस्वी ठरते. 


शहरातील नाल्यांचे चित्र 
शहरात ७२ नाले आहेत. मोठ्या नाल्यांची संख्या १८ आहे. सर्व नाल्यांची लांबी ही ५६ हजार ८२६ मीटर (५६ किलोमीटर) आहे. आता सातारा-देवळाई भागाचा मनपा क्षे़त्रात नव्याने समावेश झालेला आहे. त्यामुळे आता ही लांबी ५७ किलोमीटरच्या पुढे गेली आहे. 


पावसाळा संपला की लगेच गाळ काढायला सुरुवात करणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास ठेकेदाराने गाळ काढण्यासाठी तीन महिने घेतले आणि नंतरच्या तीन महिन्यांत तो गाळ वाहून नेला तरी काम फत्ते होते. पावसाळ्यात काही ठिकाणी गाळ काढण्यासाठी जेसीबी जाऊ शकत नाही. काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी ट्रक जाऊ शकत नाही. परंतु बारमाही प्रक्रियेत यासाठी वेळ देता येईल म्हणजे गाळ वाहून नेणे शक्य होईल. 


गाळ का वाहून नेत नाहीत? 
नाल्यातील गाळ काढल्यानंतर तो वाळावा, यासाठी काही दिवसांसाठी काठावर ठेवला जातो. कारण ओला गाळ वाहून नेणे शक्य नसते. तो सुकला की मग तो वाहून न्यावा, असा नियम आहे. ओला गाळ वाहून नेला तर त्यातील पाणी रस्त्यावर सांडू शकते. म्हणजे पुन्हा दुर्गंधीला आमंत्रण म्हणून किमान ८ दिवस हा गाळ काठावर ठेवावा, असे संकेत आहे. आपल्याकडे गाळ वाळण्यापूर्वीच पावसाला सुरुवात होते कारण गाळ काढण्यालाच आपण मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्यात सुरुवात करतो. परिणामी गाळ वाहून नेला जात नाही नव्हे, तशी ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांचीही इच्छा नसते.

बातम्या आणखी आहेत...