आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवांचे पेव: चोर असल्याच्या संशयातून दुचाकीची तोडफोड, दुचाकीस्वारास मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज/औरंगाबाद-नगर महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिकठाण येथील लाठ्या-काठ्यांसह धावून आलेल्या ग्रामस्थांनी चुलत मामाच्या गावाहून आपल्या मूळ गावी परतणाऱ्या दुचाकी चालक प्रवाशाला चोर असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. 


या घटनेनंतर रुग्णालयात उपचार घेऊन आलेल्या बंडू आसाराम अहिरे (४५, रा. पुरी (जुनी) ता. गंगापूर) यांच्या फिर्यादीवरून जिकठाण येथील मारहाण करत दुचाकीचे नुकसान करणाऱ्या अज्ञात १५ ग्रामस्थांविरोधात वाळूज पोलिसांत पोलिस निरीक्षक सतीशकुमार टाक यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी अविनाश कॉलनी वाळूज येथे संशयित महिलेला मारहाण करणाऱ्यांविरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे नागरिकांनी संशय घेऊन कायदा हातात घेणे तत्काळ बंद करावे, अन्यथा अफवा पसरवणाऱ्यांवर तसेच संशयितास मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अफवांवर कुणीही विश्वास ठेऊ नये, असे पोलिस निरीक्षक टाक यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. 


वाळूज व वाळूज एमआयडीसी दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चोरटे आल्याची खोटीच आरोळी उठवत अनेक समाजकंटक तसेच टवाळखोर तरुण विनाकारण सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. याचा वाळूज पोलिसांना सलग एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांतून प्रत्यय आला. पहिल्या घटनेमध्ये संशयातून महिलेला मारहाणप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात संबंधित बंडू अहिरे यांच्या फिर्यादीवरून १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अहिरे हे त्यांच्या चुलत मामाच्या एकलहरा नांदेडा या गावाहून परत आपल्या पुरी (जुनी) या गावी दुचाकीवर बसून िनघाले होते. दरम्यान, चिखलातून गेल्याने त्यांच्या दुचाकीच्या चाकांना लागलेला चिखल काढण्यासाठी ते जिकठाण येथे रस्त्याच्या कडेला थांबले. चाकातील अडकलेला चिखल काढत असताना अचानक त्यांच्या दिशेेने चार-पाच जण आले. त्यांनी अहिरे यांच्याकडे नाव, गाव आदींबाबत चौकशी केली. त्यावर त्यांनी सर्व माहिती दिली. मात्र, अहिरे यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता आलेल्या ग्रामस्थांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी इतरही नागरिक अहिरे यांच्या दिशेने लाठी-काठीसह धावून आले व त्यांनीसुद्धा अहिरे यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले. या प्रकरणी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला अाहेण् याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. एम. वैष्णव करत आहेत. 


नागरिकांनी पोलिस बनण्याचा प्रयत्न करू नये 
संशयित व्यक्ती किंवा संशयित वस्तू आदींबाबत नागरिकांनी स्थानिक पोलिसांना किंवा १०० नंबरवर तत्काळ फोनद्वारे माहिती द्यावी. मात्र, विनाकारण संशयातून समोरील व्यक्तीला मारहाण करत कायदा हातात घेऊ नये. स्वत:च विचारपूस करत प्रसंगी मारहाण करणाऱ्या हौशी तरुणांनी व नागरिकांनी विनाकारण पोलिस बनण्याचा प्रयत्न करू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक सतीशकुमार टाक यांनी दिली. 


'त्या' महिलेने घडवले माणुसकीचे दर्शन 
अशाच प्रकारच्या संशयातून वाळूज गावात भाड्याने खोली मिळवण्यासाठी घरोघरी जाऊन खोलीबाबत चौकशी करणाऱ्या कामगार महिलेला १५ जून रोजी दुपारी काही नागरिकांच्या टोळक्यांनी 'मुलं पळवणारी महिला असल्याच्या संशयातून' बेदम मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ काही तरुणांनी मोबाइलवर तयार करून तो व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला. त्याच व्हिडिओचा आधार घेत पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलांसह तरुणांना तत्काळ ताब्यात घेतले. मात्र, 'त्या' महिलेने माणुसकीचे दर्शन घडवत 'जाऊ द्या हो साहेब, त्यांनी गैरसमजातून मला मारहाण केली' असे उत्तर देत केवळ संशयातून बेदम मारहाण करणाऱ्यांना पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले. 

बातम्या आणखी आहेत...