आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचालकाची अतिघाई नडली; टेम्पोला धडक, 40 जण बचावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास हर्सूल टोल नाक्याजवळ रायपूर-औरंगाबाद एसटीने गिट्टीच्या टेम्पोला मागून जोराची धडक दिली. सुदैवाने या अपघातात बसमधील ४० प्रवासी बचावले. ब्रेक फेल झाल्यामुळे ही धडक झाल्याचा बनाव चालकाने केला. मी नियंत्रित वेगात बस चालवत होतो. ब्रेकच तुटले तर मी काय करणार, असे त्याचे म्हणणे होते. मात्र, आगारप्रमुख स्वप्निल धनाड व इतर अधिकाऱ्यांनी बसची तपासणी केली असता ब्रेक सुस्थितीत होते. चालकाची अति घाई अपघातास कारणीभूत ठरल्याचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.

 

ऐन दिवाळीच्या काळात म्हणजे तीन महिन्यांपूर्वी सिडको बसस्थानक उड्डाणपुलाजवळ बसचालकाच्या अतिघाईमुळे २ जण ठार झाले होते. त्या वेळीही चालकाने ब्रेक फेल झाल्याचे म्हटले होते. त्या अपघाताची पुनरावृत्ती टळली.


१७ जानेवारी रोजी सिल्लोड आगारातील एमएच २० बीएल २२५२ क्रमांकाची रायपूर-औरंगाबाद बस वेगात हर्सूल टोल नाक्यापर्यंत आली. बसचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व ती गिट्टी वाहून नेणाऱ्या टेम्पोला धडकून थांबली. अन्यथा ही बस चार ते पाच कोलांटउड्या खात, दोन-तीन वाहनांना उडवत कुठे जाऊन पडली असती हेही कळाले नसते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

पथक पोहोचले : अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. नेमकी कोणाची काय चूक झाली, कशामुळे बस धडकली? अशी विचारणा लोकांनी केली असता बसचालकाने ब्रेक फेल झाले, असे कारण सांगितले. तासाभराच्या आत एसटी महामंडळाचे पथक हर्सूल येथे पोहोचले. पथकातील तांत्रिक तज्ञांनी तातडीने ब्रेकची तपासणी केली असता ब्रेक फेल झालेच नव्हते, असे निष्पन्न झाले. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी सिल्लोड आगारप्रमुखांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला जाणार असल्याचे धनाड यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना स्पष्ट केले.


समोरील काच फुटली
सुदैवाने मोठा अपघात टळला. बसचा पुढचा भाग पूर्णपणे तुटला. काच फुटली. प्रवाशांना जोरदार झटका बसला. समोर चालणाऱ्या टेम्पोचालकाची संथगती आणि बसचालकाच्या अतिघाईमुळे हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले.

 

पोलिसांत नोंद नाही
४० जणांच्या प्राणावर बेतलेल्या या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे त्याची पोलिस ठाण्यात नोंदही झाली नाही. एसटी महामंडळाकडून तक्रार आल्यावरच गुन्हा दाखल होऊ शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

बातम्या आणखी आहेत...