आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीतील आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केल्याने सिटी चौक पाच तास बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मे महिन्यात जुन्या औरंगाबादमध्ये उसळलेल्या भीषण दंगलीत शहागंज येथील एक घर जमावाने पेटवून दिले. त्यात जगनलाल बन्सिले या दिव्यांग वृद्धाचा जळून मृत्यू झाला. या प्रकरणी अटक केलेल्या सहा जणांना न्यायालयाने २५ जूनला जामीन मंजूर केला. मात्र, याच सहा जणांवर त्याच दंगलीत पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा नोंदवत सिटी चौक पोलिसांनी लगेच अटक केली. या तरुणांना पोलिस जाणीवपूर्वक अडकवत असल्याचा आरोप करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वातील जमावाने तब्बल पाच तास सिटी चौक पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. 


नोटा दाखवून पोलिसांवर बांगड्या फेकण्यात आल्या. शिवाय प्रचंड घोषणाबाजी सुरू असल्याने शहागंज, गुलमंडी, औरंगपुरा, सराफा, केळी बाजार, जुना बाजार भागात तणाव निर्माण होऊन अनेक दुकाने बंद झाली. दुपारी एकच्या सुमारास सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी साडेपाच वाजता पोलिस आयुक्तांनी शिष्टमंडळाची बाजू ऐकून घेतल्यानंतर मागे घेण्यात आले. डॉ. गफ्फार कादरी, नासेर सिद्दिकी, अरुण बोर्डे यांनीही जमावाचे नेतृत्व केले. 


बाजारपेठ बंद...
इम्तियाज ठाण्याच्या बाहेर येताच पोलिसविरोधी प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. ती कानावर पडताच सिटी चौक, सराफा, गुलमंडी, मंजूरपुरा, बुढीलेन परिसरातील काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद केली, तर काही तरुणांच्या एक गटाने बंद पाडली. तातडीने वायरलेस साउंड सिस्टिमही आली. व्हॉट्सअॅप मेसेज करून आणि फोन करून आणखी लोकांना बोलवा, असे नेत्यांकडून कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. दुसरीकडे नेत्यांची भाषणबाजी सुरू झाली. 


पाहता पाहता जमाव...
सिटी चौक पोलिस ठाण्यातील मुस्लिम कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांसाठी ईदमिलन कार्यक्रमाचे आयोजित केला होता.पोलिस ठाण्यात त्याची तयारी सुरू होती. दुपारी एकच्या सुमारास आ. इम्तियाज ५० कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह पोलिस ठाण्यात शिरून थेट निरीक्षक दादाराव शिनगारे यांच्या दालनात गेले. 'आमच्या सहा मुलांचा बन्सिले प्रकरणात ३०२ मध्ये जामीन झाला असताना त्यांना पुन्हा हेमंत कदम प्रकरणात कलम ३०७ कलम लावून अटक कसे करता?' असा सवाल त्यांनी केला. हा अन्याय आहे. पोलिसांकडून ठरवून या गोष्टी होत आहेत, असेही ते म्हणाले. शिनगारे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. म्हणून शिनगारेंनी वरिष्ठांना माहिती दिली. तोपर्यंत पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव उभा राहिला होता. 


आमदार इम्तियाज यांनी भाषणात पोलिसांवर केलेले आरोप असे : 
१ हप्तेबाजी करणाऱ्यांना सिटी चौक पोलिसांनी संरक्षण दिल्याने ११ मे रोजी दंगल झाली. 
२ पोलिसांना पैशाची एवढीच गरज असेल तर आम्ही रोज जनतेकडून पैसा जमा करून पोलिसांना आणून देऊ. 
३ पोलिस उपायुक्त ढाकणंेनी न्याय देण्याऐवजी विश्वासघात केला. 
४ राजेंद्र जंजाळ, लच्छू पहिलवानला जामीन मिळतो. मग आमच्या फिरोज खानला का नाही? 


आ. जलील यांच्या आरोपांवर पोलिसांची बाजू अशी : 
१ ३०२ च्या प्रकरणातून जामीन झालेल्या सहा आरोपींना पुन्हा ३०७ मध्ये अटक केली. कारण महिनाभरात झालेल्या तपासात ते दोषी असल्याचे पुरावे सापडले आहेत. 
२ मंगळवारी पूर्वपरवानगीविना आंदोलन झाले. त्याचे चित्रीकरण केले असून योग्य ती कारवाई केली जाईल. 
३ या आंदोलनाचा तपासावर काहीही परिणाम होणार नाही, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 


जमाव एवढा की पोलिस आयुक्तही आले मागच्या दाराने 
साडेचार वाजेपर्यंत सिटी चौकात हजारोंचा जमाव होता. त्यापूर्वीच पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद आले असते तर तिढा सुटला असता. पण तसे झाले नाही. ते आले तेव्हा जमाव एवढा संतप्त आणि मोठ्या संख्येने होता की त्यांना पोलिस ठाण्याच्या मागील दरवाजाने जमावासमोर यावे लागले. 

 

बातम्या आणखी आहेत...