आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : विश्वासार्हतेचीच हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूरमध्ये झालेली एका कोचिंग क्लास चालकाची हत्या आणि औरंगाबादमध्ये राहुल श्रीरामे नामक पोलिस उपायुक्तावर दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा यामुळे मराठवाड्याचे जनमानस स्तंभित झाले आहे. मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी हजारो पालक मुलांना ज्यांच्याकडे विश्वासाने सोपवतात त्यांच्या आत पैशांसाठी हत्या करण्याइतपत लालची आणि क्रूर सैतान दडलेला असावा? ज्यांच्या अस्तित्वामुळेच महिला, मुलींना समाजात सुरक्षिततेची भावना यावी त्या पोलिस अधिकाऱ्यामध्येही तरुण मुलीवर बलात्कार करण्याची वृत्ती बाळगणारा नरपशू दडलेला असावा? या प्रश्नांनी सर्वसामान्य मराठवाडी माणसाला हादरवून टाकले आहे. विश्वास ठेवावा तर कोणावर आणि कसा, हा आज त्यांच्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. ज्यांनी अशा प्रकरणात पुढाकार घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, त्यांनीच सोयीस्कर मौन धारण केले आहे. 


दोन्ही प्रकरणे भिन्न असली आणि दोन्ही ठिकाणांमध्ये शेकडो किलोमीटर्सचे अंतर असले तरी दोघांमध्ये एक साम्य महत्त्वाचे आहे. दोन्ही प्रकरणातील मुख्य घटकांनी समाजाचा विश्वासघात केला आहे. लातूरला शिक्षण चांगले मिळते, असा प्रचार झाल्यामुळे तिथे लांबलांबचे पालक आपल्या पाल्यांना शिकवणीसाठी पाठवतात. त्यातून कोचिंग क्लासेस ही एक इंडस्ट्रीच तिथे विस्तारली आहे. नाव झाले की पैसा आपोआपच मिळतो. त्या पैशांचे पाट या शहरात कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून वाहू लागले आहेत. 


ज्यांनी या क्षेत्राकडे धंदा म्हणून पाहिले त्यांनी तर धंदेवाईकपणे खोऱ्याने पैसे ओढणे सुरू ठेवले आहे. हाच पैसा दोन क्लासचालकांमध्ये वैराची भिंत उभी करता झाला आणि त्यातल्या एकाचा त्यात बळी गेला. ज्याने खून केला तोही एका क्लासचा चालक आणि शिक्षक आहे. जो मारला गेला तो कोचिंग क्लासकडे व्यवसाय म्हणून पाहत होता. स्वत: दहावी नापास असूनही त्याने शिक्षकांना नेमून क्लास वाढवला होता. मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांची बक्षिसे दिल्याचा त्याचा दावा होता आणि पुढच्या वर्षी तो दोन कोटी रुपयांची बक्षिसे वाटणार होता. तशी घोषणाही त्याने केली होती. ज्या जुन्या भागीदार क्लास चालकाने त्याला संपवले त्याने सराईत गुन्हेगारांना २० लाखांची सुपारी दिली होती. हे आकडे तिथे क्लासेसच्या माध्यमातून काय अर्थकारण चालले आहे याची कल्पना देणारे आहेत. ही घटना घडली आणि पुढे सारे मौनात गेले. ना त्यावर सत्ताधारी आणि विरोधक ब्र काढत आहेत, ना शिक्षणसम्राट. विद्यार्थी आणि त्यांचे पालक केवळ अवाक् होऊन घडेल ते पाहत राहण्याच्या भूमिकेत गेले आहे. त्यांनाही कसे तरी करून स्पर्धा परीक्षेत मेरिट मिळवायचे आहे. लातूरचे आणि शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांचे पुढे काय व्हायचे ते होईल, अशी त्यांची मन:स्थिती आहे. 


बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपायुक्तांच्या प्रकरणातही पोलिस यंत्रणा अशीच मौन धारण करून बसली आहे. गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले आहेत; पण पीडित मुलगी सापडत नाही, असे सांगत या प्रकरणाचा तपास इंचभरही पुढे सरकलेला नाही. या प्रकरणात आरोपी राहुल श्रीरामे दोषी आहेत की नाही, हा नंतरचा मुद्दा आहे. पण त्यांच्या जागी कोणी व्यावसायिक किंवा सर्वसामान्य माणूस असता तर त्याला पोलिसांनी कधीच फरपटत पोलिस ठाण्यात नेऊन कोठडीत टाकले असते. इथे आरोपी पोलिस उच्चाधिकारी असल्यामुळे त्याला काहीही होणार नाही, असा विचार सामान्य जनता करू लागली आहे. 


पोलिसांची प्रतिमा त्यातून मलिन तर होतेच आहे; पण विश्वासार्हतेवर असलेले प्रश्नचिन्ह आणखी गडद होत चालले आहे. कचऱ्याचा प्रश्न जटिल बनला होता त्या वेळी मिटमिटा येथे कचरा टाकायला विरोध करणाऱ्यांनी कचऱ्याच्या गाड्या जाळल्या होत्या. पोलिसांवर दगडफेक झाली होती. त्याचा बदला पोलिसांनी घेतला आणि घरात घुसून महिलांना जबर मारहाण केली होती. त्या प्रकरणी जनक्षोभ उसळल्यावर उच्चाधिकाऱ्यामार्फत या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. 


त्या चौकशीसाठी पोलिस महासंचालक सतीश माथूर २८ जून रोजी शहरात येऊन गेले. ३० जून रोजी ते निवृत्त होणार होते. महिनाभरात चौकशी होईल, असे आश्वासन सरकारने दिले होते आणि प्रत्यक्षात माथूर आलेच १०४ दिवसांनंतर. निवृत्तीच्या आधीचा दौरा कशासाठी असतो, हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यालाच चौकशीचे लेबल लावले गेले. निवृत्तीच्या मन:स्थितीत माथूर यांनी काय अहवाल दिला असेल? पोलिस यंत्रणेवरचा विश्वास संपत चालला आहे तो यामुळे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रिपद सांभाळणारे फडणवीसही 'वेगळे' गृहमंत्री ठरले नाहीत, हेच खरे. 

- दीपक पटवे, निवासी संपादक, औरंगाबाद 

बातम्या आणखी आहेत...