आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर अश्लील फोटो टाकून पत्नीची बदनामी; इंटरनेटसाठी वापरले मेव्हण्याचे सिम कार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पत्नी घटस्फोट देत नाही म्हणून पतीने पत्नीचे अश्लील छायाचित्र फेसबुकवर टाकून तिची बदनामी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


सीमा (नाव बदलले आहे) हिचे रवींद्रसोबत सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. रवींद्र पेंटर म्हणून काम करतो. काही दिवसांनी त्यांच्यात वाद सुरू झाले. सततच्या वादामुळे सीमाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि ती बेगमपुरा परिसरात राहणाऱ्या आई-वडिलांकडे राहण्यास गेली. जानेवारीत सीमाच्या भावाला तिच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. काही दिवसांनंतर त्याला बहिणीच्या त्या फेसबुक अकाउंटवर अश्लील छायाचित्रे आणि मजकूर आढळला. याविषयी त्याने सीमाला विचारले असता आपले फेसबुकवर अकाउंट नसल्याचे तिने सांगितले. हा प्रकार सुरू असतानाच रवींद्रने मोबाइलवरून सीमाला अश्लील टेक्स्ट मेसेज पाठवले. सीमाने याप्रकरणी १२ डिसेंबर रोजी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठत निरीक्षक राजश्री आडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे आडे व त्यांच्या पथकाने हा प्रकार सीमाचा पती करत असल्याचे उघडकीस आणले. 


रवींद्रने पत्नीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले हाेते. ५ मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली. विभक्त झाल्याने तिची बदनामी करत असल्याचे त्याने कबूल केले. सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजश्री आडे, पोलिस नाईक देवा सूर्यवंशी, श्रीकांत सपकाळ आणि अविनाश जाधव यांनी ही कारवाई पार पाडली. 


मेव्हण्याचे सिम कार्ड वापरले
रवींद्रने हा प्रकार महिन्याभरापूर्वी सुरू केला. त्याने ज्या क्रमांकावरून इंटरनेट वापरले आणि सीमाला मेसेज केले त्या क्रमांकाचा मूळ मालक आणि लोकेशनचा शोध पोलिसांनी सुरू केला. तेव्हा हा मोबाइल क्रमांक रवींद्रच्या बहिणीच्या नवऱ्याच्या नावावर असल्याचे समोर आले. त्याची चौकशी केली असता रवींद्र हा क्रमांक मागील एक वर्षापासून वापरत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर रवींद्रला अटक करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...