आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही चॅनल व वर्तमानपत्रात बातमी देण्याची धमकी, दुकानदाराकडे मागीतली 50 हजारांची खंडणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- तुम्ही स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री करत असल्याची बातमी टीव्ही चॅनल व वर्तमानपत्रात बातमी देण्यात येईल. मात्र, हा प्रकार टाळायचा असेल तर आम्हाला ५० हजार रुपये द्यावे लागतील,असे म्हणून लिंबेजळगाव येथील स्वस्त धान्य दुकानदारास बदनामीची धमकी देणाऱ्या तीन खंडणीबहाद्दरांविरुद्ध वाळूज पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा नोंदवला आहे. 


संतोष गवळी यांच्या पत्नी आशाबाई गवळी या स्वस्त धान्य दुकान चालवतात, तर त्यांना पती संतोष गवळी हे व्यवसायात मदत करतात. मंगळवारी सकाळी आशाबाई गवळी यांनी नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता दुकान सुरू करून ग्राहकांना स्वस्त धान्य वाटप केले. तेव्हा त्यांना पती संतोष यांनीही मदत केली. त्यानंतर ११ वाजता त्यांनी दुकान बंद केले. काही वेळानंतर तेथे तिघे जण अनोळखी आले. त्यांनी आम्ही न्यूज चॅनलवाले असून तुमच्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करावयाची असल्याचे संतोष गवळी यांना सांगितले. तेव्हा गवळी यांनी त्यांना ठीक आहे, असे म्हणताच ते तिघेही बळजबरीने दुकानात शिरले. आत आल्यानंतर त्यांनी १० किलो तांदूळ देण्याची मागणी केली. तेव्हा गवळी यांनी त्यांना पैसे न घेता तांदूळ दिले. 


अनोळखी तिघांनी दूरचित्रवाणीच्या न्यूज चॅनलचे असल्याचे सांगून तांदूळ पदरात पाडून घेतल्यानंतर गवळी यांच्यासमोरच कॅमेरा सुरू केला. त्यांनी दुकानासह घराचे शूटिंग करत तुम्ही स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्री करता. त्यामुळे ही बातमी न्यूज चॅनलसह वर्तमानपत्रांतून दिली जाणार आहे. ही बातमी थांबवायची असेल तर आम्हाला ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे धमकावले. तेव्हा गवळी यांनी त्यांना आेळखपत्र विचारले असता, त्यांनी आेळखपत्र दाखवले नाही. तेव्हा ग्रामस्थांनी धाव घेऊन तिघांना चांगला प्रसाद देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पाेलिस चौकशीत त्यांनी रामेश्वर दरेकर, योगेश पवार, सयद अलीम (रा. वाळूज, आैरंगाबाद) अशी नावे सांगितली. वाळूज पोलिसांनी तिघांविरुद्ध खंडणी मागितल्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. 


कॅमेरा फुटला 
दरम्यान, स्वस्त धान्य दुकानातून अवैधरीत्या धान्य विक्री चालू होती. या प्रकाराची बातमी घेण्यासाठी चित्रीकरण करत असताना संतोष गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला. यात कॅमेरा फुटल्याने १ लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार बाबूलाल राठोड यांनी वाळूज पोलिसांत दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...