आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलच्या मापात पाप करणाऱ्या कर्मचाऱ्याची तत्काळ हकालपट्टी, जागरूक ग्राहक आता पाठपुरावा करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - ५०० रुपयांची नोट देऊन ३०० रुपयांचे पेट्रोल दुचाकीत भरणाऱ्या ग्राहकाला बोलण्यात गुंग ठेवून तब्बल ११० रुपयांचे पेट्रोल कमी देणाऱ्या कर्मचाऱ्याचा प्रताप जागरूक ग्राहकाने मालकाच्या निदर्शनास आणून देताच संबंधित कर्मचाऱ्याची व्यवस्थापनाने तत्काळ हकालपट्टी केल्याची घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील 'अरिहंत पेट्रोल पंपावर' मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

 

औरंगाबाद-नगर महामार्गावरील ए. एस. क्लब चौकालगत असणाऱ्या अरिहंत पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अभिजित देशमाने या ग्राहकाने ५०० रुपये देऊन ३०० रुपयांचे पेट्रोल दुचाकीत टाकण्यास पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास सांगितले. त्यावर तुमच्याकडे सुट्टे ३० रुपये आहेत का? असा प्रश्न करून बोलण्यात गुंग ठेवत ११० रुपयांपासून पुढे पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली. मात्र, जागरूक देशमाने यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कर्मचाऱ्याला शून्य न दाखवताच पेट्रोल कसे काय टाकले? असा जाब विचारला, त्यावर कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान देशमाने यांनी त्यांच्या मोबाइलवर संपूर्ण घटनेचे चित्रण तयार करण्यास सुरुवात करताच कर्मचारी गोंधळून गेला.

 

प्रिंटेड बिल मिळाले नाही
ग्राहकांना पेट्रोल कमी टाकल्याची शंका येताच त्यांनी संबंधिताकडे प्रिंटेड बिल मागणे योग्य. याप्रमाणे देशमाने यांनी प्रिंटेड बिलाची व्यवस्थापनाकडे मागणी केली. मात्र, प्रिंटेड बिलाची मशीन गेली सहा ते सात महिन्यांपासून बंद असल्यामुळे व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपातील बिल देण्यात आले. दरम्यान येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये पाठपुरावा करून प्रिंटेड बिल मिळण्याची सुविधा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.


व्यवस्थापकाकडून मोजमाप
संबंधित व इतर ग्राहकांची शंका दूर करण्यासाठी व्यवस्थापकाकडून ५ लिटरच्या मापाद्वारे पेट्रोल पंपातून काढून मोजमाप करण्यात आले. त्यावेळी मापानुसार पेट्रोल बरोबर ५ लिटर भरले गेले. त्यावर उपस्थित ग्राहकांकडून मापात पेट्रोल बरोबर भरले गेल्याबाबतच्या सह्या घेत नोंद करण्यात आली.

 

तक्रार केली नोंद
ग्राहक देशमाने यांनी संबंधित कर्मचाऱ्याकडून पेट्रोलसाठी ११० रुपयांच्या रकमेवर डल्ला मारल्याचा उल्लेख तसेच सर्व घटना तक्रार नोंद वहीमध्ये नमूद करण्यात आली. त्यांच्या तक्रारीबाबत डीलर म्हणून समीर वानखेडे यांनी त्यांचा अभिप्राय त्यावर नोंदवला.

 

वरिष्ठांकडून टोलवाटोलवी
ग्राहकांना प्रिंटेड बिल का मिळत नाही, यासंदर्भात मत जाणून घेण्यासाठी भारत पेट्रोलियमच्या सहायक व्यवस्थापक जयश्री चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, बोलण्याचा अधिकार माझा नसून तो अहमदनगर येथील व्यवस्थापक अमित मोहन यांचा आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा, असे 'दिव्य मराठी'ला सांगितले. अमित मोहन व जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क न झाल्याने त्यांचे मत कळू शकले नाही.

 

पाठपुरावा करणार
या संदर्भात पेट्रोल कंपनीच्या सहायक व्यवस्थापिका जयश्री चौधरी यांच्या सांगण्यानुसार त्यांना मेलद्वारे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात मी तक्रार केली आहे. त्यामुळे या विषयी मी नियमित पाठपुरावा करणार असल्याचे अभिजित देशमाने यांनी दैनिक दिव्य मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

 

इतरांच्यासुद्धा तक्रारी
देशमाने यांच्या प्रमाणेच लक्ष्मण नाईक यांनासुद्धा याच कर्मचाऱ्याकडून दुचाकीची पासिंग कुठली आहे? असा प्रश्न विचारून बोलण्यात गुंग ठेवत कमी पेट्रोल टाकल्याचा अनुभव त्यांनी यावेळी पेट्रोल व्यवस्थापक व मालक यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर व्यवस्थापनाच्या वतीने सर्वच कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली की, ग्राहकांशी वाद किंवा संवाद साधत बसण्याची गरज नाही. त्यांच्या सांगण्याप्रमाणे पेट्रोल शून्य दाखवून विक्री करावे.

 

बातम्या आणखी आहेत...