आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोजच्या चारशे टन कचऱ्याचे सहज करता येईल खत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील कचऱ्याच्या समस्येवर गोंधळलेल्या महापालिका प्रशासनाला अखेर उद्योजकांनी उपाय सुचवला. उद्योजक राम भोगले यांनी पुढाकार घेत गुजरात येथील एक्सेल इंडस्ट्रीज या कचऱ्यापासून खत निर्मितीचा पर्याय देणाऱ्या कंपनीला शहरात बोलावले आणि मनपाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले. या कंपनीने अनेक पर्याय दिले. मुंबई, पुण्यात काम करणाऱ्या या कंपनीने कचऱ्याची समस्या सहज सुटेल, असे सांगत मनपाने कचऱ्याचे वर्गीकरण करावे, बाकीचे काम आम्ही करू असे, आश्वासन दिले.


भोगले यांनी गुजरात येथे गेल्या तीस वर्षांपासून काम करणाऱ्या एक्सेल इंडस्ट्रीजचे मालक आश्विनभाई श्रॉफ यांना बोलावून घेतले. त्यांनी रविवारी सकाळी ११.३० वाजता मनपाचे पदाधिकारी अन् अधिकाऱ्यांसमोर या समस्येवर उपाय सुचवले. औरंगाबाद शहराची समस्या मुंबई, पुण्याच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे कचऱ्याचे नियोजन सहज शक्य आहे, असे सांगत अनेक पर्याय सांगितले. 


पुण्यात १९९ रुपये शुल्क
कंपनीचे अधिकारी नथुराम मुंडे म्हणाले, मोठे शेड घेऊन पाच टन क्षमतेची आठ, दहा यंत्रे घेतली तर संपूर्ण शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन उत्तम होईल. एक पाच टन मशीन आणि त्याच्या सेटअपचा खर्च दीड कोटी रुपये आहे. फक्त यंत्रे घेतली तर खर्च कमी येईल. गुजरातमधील राजकोट शहराची यंत्रणा कंपनी तीस वर्षांपासून सांभाळत आहे. पुण्यात १९९ रुपये महिना इतके सभासद शुल्क आकारून कचरा संकलन केले जाते. 


महापौरांनी काढल्या नोट्स
या वेळी मनपा आयुक्त दीपक मुगळीकर, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, विकास जैन, नगरसेवक राजू शिंदे, शहर अभियंता सखाराम पानझडे, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योजक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. कंपनीचे अधिकारी सादरीकरण करत असताना महापौर व अभियंता पानझडे यांनी नोट्सही काढल्या.  

 

सुचवलेले उपाय....
- मनपाने यंत्रे विकत घेऊन खत निर्मिती करावी. 
- मोबी रेस्ट पद्धत वापरून वाहनामध्येच यंत्रे फिट करून कचरा संकलन करतानाच यंत्रातून खत निर्मिती करावी. 
- कंत्राटी पद्धतीने कंपनीकडून काम करून घ्यावे. जागा, यंत्रे मनपाची. कचऱ्याचे संकलन करून आणून दिले तर आम्ही खत तयार करू. 

- घरातूनच कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करणे सक्तीचे करून कचरा वेगवेगळा गोळा करा.  घनकचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातून बायोगॅस तयार होईल. 
- दररोज शहरात ४०० टन कचरा तयार होतो. वर्गीकरण केले तर २०० टन कचरा कमी होईल. 


४० कोटींत सुटेल शहराची समस्या 
मनपा कचऱ्यावर वर्षाला किती खर्च करते असा प्रश्न उद्योजकांनी केला. त्यावर ५० ते ६० कोटी रुपये असे उत्तर येताच मोबाइलच्या कॅलक्युलेटरवर गणित करून उद्योजकांनी सांगितले की, मनपा एक किलो कचऱ्यामागे साडेतीन रुपये रोज खर्च करते. एकदाच ४० कोटी खर्च केले तर शहराची समस्या सहज सुटेल. शिवाय मनपाला यापासून खत मिळेल. ते दोन रुपये किलो दराने लोकांना विकता येईल. 

बातम्या आणखी आहेत...