आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत सुटेल कचऱ्याचा प्रश्न : घोडेले; चार बायोमेकॅनिकल कंपोस्ट मशीन विकत घेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सीएमआयए हॉलमध्ये रविवारी एक्सेल कंपनीने कचऱ्यापासून खत तयार करण्याचे सादरीकरण केल्यानंतर तत्काळ मशीन खरेदी करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. शहरात चार बायोमेकॅनिकल कंपोस्ट मशीन बसवण्यात येतील. त्यामुळे येत्या तीन दिवसांत कचऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल, असा विश्वास महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला. 


गेल्या १७ दिवसांत शहरात सहा ते सात हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. यातील तीन ते साडेतीन हजार टन कचऱ्याची मनपाने विल्हेवाट लावली. यापुढे वर्गीकरण केलेलाच कचरा घेतला जाईल. भविष्यात कचरा रस्त्यावर दिसणार नाही. येत्या तीन दिवसांत कचऱ्याचा प्रश्न शंभर टक्के सुटेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. 


घोडेले म्हणाले, सद्यःस्थितीत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. यासाठी मनपा फंडातून बायोमेकॅनिकल कंपोस्टिंगच्या चार मशीनची खरेदी करण्यात येणार आहे. चारपैकी एक मशीन मध्यवर्ती जकात नाका येथे वर्गीकरण केंद्रात, एक चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये नगरसेवक राजू शिंदे यांनी तयार केलेल्या शेडमध्ये बसवण्यात येतील. उर्वरित दोन मशीन वाहनावर ठेवून शहराच्या वेगवेगळ्या भागात जिथे कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण होते, त्या वाॅर्डातून फिरवण्यात येतील. सोमवारपासून ओला व सुका कचरा वेगवेगळा करुनच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे देणे नागरिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या तीस वाॅर्डांमध्ये वर्गीकरण होते. आठ दिवसांमध्ये १०० टक्के वाॅर्डांमध्ये वर्गीकरण होईल, असा विश्वास व्यक्त केला. 


अधिकाऱ्यांनी केली ३ ठिकाणी पाहणी
मनपाच्या वतीने एक्सेल कंपनीच्या मशीन खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर लगेच शहर अभियंता पानझडे, कंपनीचे अधिकारी व सीआरटीच्या गौरी मिराशी यांनी सेंट्रल नाका, एन-१ येथील सेंट झेवियर्स शाळेजवळ आणि एन- ५ येथील कम्युनिटी सेंटरची पाहणी केली. येथे मशीन बसवणे योग्य आहे किंवा नाही याचा अहवाल सोमवारी देण्यात येईल. 


पर्यायांवर निर्णय नाही 
एन-१२ बारा, किलेअर्क व सिद्धार्थ उद्यानासमोर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या शासकीय जमिनी असून येथील कचरा कंपोस्टिंग करण्यासाठी या जमिनींचा वापर करता येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र यावर अधिकाऱ्यांनी अद्याप ठोस निर्णय घेतला नाही. 

बातम्या आणखी आहेत...