आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत घरोघरी पाइपने गॅस; किमान 32 हजार 500 घरांना फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- येत्या दीड वर्षात औरंगाबादेत सीएनजीचा पुरवठा केला जाणार असून त्याद्वारे घरांना स्वयंपाकाचा गॅस, वाहनांसाठी इंधन, व्यावसायिक व औद्योगिक प्रतिष्ठानांच्या वापरासाठी सीएनजी वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. डीएमआयसीची गरज व स्मार्ट सिटी या दोन्हींमुळे औरंगाबादला सीएनजीचा पुरवठा केला जाणार आहे. 


पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाने आज देशातील सीएनजी पुरवठ्याबाबत शहरांची नववी यादी जाहीर करीत निविदा मागवण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यात देशातील १७४ शहरांचा समावेश आहे. आज जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनंतर पुढील तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंपनीला काम देऊन ते पूर्ण करून घेतले जाणार आहे. ही सारी प्रक्रिया पूर्ण होऊन दीड ते दोन वर्षांत औरंगाबादला सीएनजी पुरवठा सुरू होणार आहे. या यादीत महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक व लातूरचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रथमच या शहरांसोबत लगतची शहरेही जोडली जाणार आहेत. औरंगाबादला अहमदनगर, नाशिकला धुळे व लातूरला उस्मानाबाद जोडण्यात आले आहे. प्रदूषणाचा विळखा वाढत असताना पर्यावरणस्नेही इंधनाचा वापर वाढावा तसेच आर्थिकदृष्ट्याही परवडणाऱ्या दरातील सीएनजीचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्याचाच हा एक भाग आहे. 


नगरहून होऊ शकतो सीएनजीचा पुरवठा
औरंगाबादला लागणारा सीएनजीचा पुरवठा अहमदनगरहून केला जाऊ शकतो. आंध्रातील कृष्णा-गोदावरी खोऱ्यात सापडलेला नैसर्गिक वायू वाहून नेणारी रिलायन्सची काकीनाडा ते भरूच ही गॅस पाइपलाइन नगरहून जाते. तेथून औरंगाबादसाठी वायू पुरवठा केला जाऊ शकतो. याशिवाय द्रवरूप वायू मागवून त्यावर प्रक्रिया करून सीएनजीत रूपांतर करण्याचा प्रकल्पही उभारला जाऊ शकतो. प्रत्यक्ष निविदा निघाल्यावर त्यातून नेमका कोणता पर्याय स्वीकारला जाईल, हे स्पष्ट होईल. गुजरातमधील दाहोद व कोकणातील दाभोळ येथून द्रवरूप गॅस आणता येऊ शकतो. 


चार श्रेणींत पुरवठा 
सीएनजीचा पुरवठा चार श्रेणींत केला जाणार आहे. घरगुती वापरासाठी घरापर्यंत पाइपलाइनने, वाहनांना इंधन म्हणून, व्यावसायिक वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी अशा चार श्रेणींत पुरवठा केला जाईल. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या अटींनुसार पुरवठादाराला शहराच्या एकूण घरांच्या किमान २५ % घरांना गॅस पुरवठा करावा लागेल. औरंगाबादेत १.३० लाख निवासी मालमत्ता असून त्यातील किमान ३२, ५०० घरांना दोन वर्षांनंतर गॅस पुरवठा केला जाईल. 


वाहनधारकांना मिळणार इंधनाचा स्वस्त पर्याय 
हवेच्या प्रदूषणाबाबत राज्यातील १७ कुख्यात शहरांच्या यादीत औरंगाबाद सातव्या क्रमांकावर आहे. 'नीरी' ने केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे. पेट्रोल व डिझेलच्या वापरामुळे प्रदूषणात वाढ होत असून पर्यावरणस्नेही सीएनजीच्या वापराची गरज भासत आहे. सीएनजीचे दरही पेट्रोल व डिझेलपेक्षा कमी आहेत. शिवाय पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना प्रति किमी चार ते सहा रु. प्रति किमी खर्च येतो, सीएनजीमुळे हाच खर्च दीड ते अडीच रुपये प्रति किमी येतो. वाढत्या पेट्रोलदरामुळे संकटात पडलेल्या नागरिकांना हा पर्याय उपलब्ध होणार आहे. 


डीएमआयसी, स्मार्ट सिटीमुळे गरज 
डीएमआयसीत मोठ्या प्रमाणात गॅस लागेल. ती गरज लक्षात घेऊन सीएनजी उपलब्ध केला जाणार आहे. सध्या औरंगाबादेतील विविध औद्योगिक वसाहतींत एकूण ५ हजार कारखाने आहेत. त्यापैकी बहुतांश कारखान्यांना सीएनजी उपलब्ध होईल. स्मार्ट सिटी प्रकल्पातील सर्व शहरांत पर्यावरणस्नेही इंधनाचा वापर बंधनकारक असल्याने सीएनजीची गरज आहेच. 


सोलापूर, रत्नागिरीतील काम पूर्णत्वाकडे 
गतवर्षी मार्चमध्ये सोलापूर व रत्नागिरी या शहरांना सीएनजी पुरवठा करण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली. सोलापुरातील काम पूर्णत्वाकडे आहे. देशात सीएनजीचा सर्वाधिक वापर गुजरातेत होतो. तेथील २२ जिल्ह्यात सीएनजी उपलब्ध असून उद्योगांना त्याचा लाभ झाला आहे. महाराष्ट्रात सहा ठिकाणीच सीएनजीचा वापर होत असून आता त्यातही वाढ होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...