आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरेंचा औरंगाबादेत 2 दिवस मुक्काम, चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीला हर्षवर्धन जाधवांचा विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'खासदार चंद्रकांत खैरे औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना संपवतील. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खैरेंना बदलून दुसरा उमेदवार द्या', अशी जाहीर मागणी करणारे शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत गुरुवारी होणाऱ्या बैठकीसाठी अन्य आमदारांप्रमाणेच विशेष निमंत्रित आहेत. मात्र, या बैठकीत त्यांच्या भूमिकेवर एका शब्दानेही चर्चा होणार नसल्याचेच संकेत आहेत. 


दरम्यान, खैरेंच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे काही शिवसैनिकांकडून बैठकीच्या ठिकाणी खैरेंच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन केले जाण्याची तयारी बुधवारी सुरू झाली. त्या शक्तीप्रदर्शनाबाबत खैरे काय भूमिका घेतात ते मात्र, समजू शकले नाही. पक्ष पातळीवर असे शक्तीप्रदर्शन थोपवले जाण्याचा प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरू होता, अशीही माहिती आहे. 


आज सायंकाळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची बैठक होईल. वेळापत्रकानुसार सर्व बैठका झाल्या तर सायंकाळी ६ वाजता बैठक सुरू होईल. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह निवडणुकीसाठीचे मराठवाडा विभागाचे नेते मंत्री रामदास कदम, विश्वनाथ नेरुळकर उपस्थित असतील. खैरे व जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार, दोन्ही जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि सर्व तालुकाप्रमुख यांनाही या बैठकीला बोलावले आहे. विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघनिहाय एकेक पानी अहवाल तयार असून त्यावर नियोजन या बैठकीत होईल, असे समजते. 

 

जाधवांच्या भूमिकेकडे लक्ष 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी बाबत भाष्य करून आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पक्षात खळबळ उडवली असली तरी आज ते बैठकीत हा विषय काढणार नसल्याचे समजते. आपण या आधीच उद्धव ठाकरे यांना आपली भूमिका कळवली आहे, असे ते म्हणाले. 


जाधवांच्या मागे कोण याचा शोध घेतोय : खैरे 
खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हर्षवर्धन जाधव माध्यमांशी बोलताना काय म्हणाले, हे मी उद्धव ठाकरे यांच्या कानी टाकले आहे. कोणाचे काय करायचे हे आता तेच ठरवतील. त्यांच्या मागे कोणी असल्याशिवाय असे होणार नाही, याची मला कल्पना आहे. त्याचा शोध मी घेतोय, असे खैरे म्हणाले. जाधवांमागे पक्षातील व्यक्ती आहे की अन्य पक्षातील, असा प्रश्न केला असता कोणी तरी आहे, ती व्यक्ती कोण, याचा शोध घेऊन कोण ते तुम्हाला सांगेन. कोणत्या पक्षाचा हे सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले. 


रामदास कदम यांची उपस्थिती 
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि लोकसभा निवडणुकीसाठीचे मराठवाडा, अहमदनगर आणि सोलापूरचे निरीक्षक रामदास कदम या बैठकीस उपस्थित राहाण्यासाठी बुधवारीच शहरात दाखल झाले आहेत. त्यांची भूमिका हर्षवर्धन यांच्या भूमिकेसंदर्भात काय असेल, याकडेही शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे. 


दोन दिवसांचा दौरा, तरी पक्षप्रमुखांकडे सामान्य सैनिकांसाठी वेळ नाही! 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. औरंगाबादेत मुक्कामी राहून १० जिल्ह्यातील १२ लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख कार्यकर्त्यांशी निवडणूक कशी जिंकणार यावर ते चर्चा करणार आहेत. परंतु ज्यांच्या जिवावर ती जिंकायची आहे, त्यांच्यासाठी वेळच न ठेवल्याने शिवसैनिक नाराज आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यात फक्त नि फक्त प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा एवढेच नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता विशेष विमानाने त्यांचे आगमन होईल. तेथून ते पदमपुऱ्यात जातील. आमदार संजय शिरसाट यांच्या नूतनीकरण झालेल्या कार्यालयाचे उद््घाटन त्यांच्या हस्ते होईल. तेथून ते सुभेदारी विश्रामगृहावर जातील. तेथे सायंकाळपर्यंत मराठवाड्यातील ८ लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. शुक्रवारी अहमदनगर व सोलापूर या दोन जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन अशा चार लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची बैठक संपल्यानंतर दुपारी विमानाने रवाना होतील. ठाकरे यांच्या या दोनदिवसीय दौऱ्यात सामान्य शिवसैनिकांसाठी मात्र वेळ राखून ठेवण्यात आलेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...