आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली, परभणी जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी गारांचा तडाखा, नांदेड जिल्ह्यात पिकांचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रविवानंतर सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना गारपिटीचा तडाखा बसला. सोमवारी हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात  गारांच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर एका महिलेच्या अंगावर शेड पडून तिचा मृत्यू झाला.


परभणी जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील काही भागात पावसाचे आगमन झाले.   मात्र जिंतूर व सेलू तालुक्याला गारपिटीने दुसऱ्याही दिवशी झोडपले.    दुपारी साडेचारच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील कावलगाव, चुडावा व गौर या मंडळांत अचानक वादळी वारे व विजांच्या  कडकडाटात गारपीट झाली. त्यामुळे ग्रामस्थांची एकच पळापळ सुरू झाली.

 

गारपिटीपासून बचाव करण्यासाठी भागिरथीबाई कांबळे( ३५) ही महिला पत्र्याच्या शेडखाली उभी होती. त्याच वेळी पत्र्याचे शेड अंगावर पडल्याने ती जबर जखमी झाली. तिला नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. गारपिटीने ज्वारी, गहू, ऊस आणि हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले. पूर्णा नांदेड या राज्य महामार्गावरील झाडे रस्त्यावर आडवी पडली.  त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल दोन तासानंतर पोलिस व नागरिकांच्या पुढाकारातून हा रस्ता मोकळा करण्यात आला. चुडावा परिसरात विजेचे रोहित्रही जमीनदोस्त झाले. कावलगाव, गौर, चुडावा, बरबडी, भाटेगाव, सारंगी, कंठेश्वर, कानडखेड, महागाव, निळा, धनगर टाकळी, आडगाव, अजदापूर, सातेगाव, पिंपळगाव सोन्ना, न-हापूर, आलेगाव आदी गावांना गारांनी झोडपले.

 

आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल
रविवारपाठोपाठ सोमवारीही गारपिटीचा मराठवाड्याला तडाखा बसला. सोमवारी हिंगोली, परभणी आणि नांदेड हे तीन जिल्हे नैसर्गिक आपत्तीत सापडले. या तिन्ही जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील उभे पीक जमिनदोस्त झाले.  परभणी जिल्ह्यात चुडावा (ता. पूर्णा)  येथे पत्र्याचे शेड अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशीच्या  या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. 

 

नांदेड : लिंबगाव परिसरात गारपीट

खरिपात रोगराई, बोंडअळी अन् पडलेल्या भावाने नागवलेल्या बळीराजाला रब्बीत गारपिटीने उद्ध्वस्त केले आहे. नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास नांदेड तालुक्यातील लिंबगाव परिसरात जोरदार गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी, हिमायतनगर, हदगाव, नांदेड यासह अन्य तालुक्यांत सोमवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. तर नांदेड तालुक्यातील लिंबगाव व वडवणा, पोकर्णी, धानोरा, ढोकी, सायाळ आदी भागातही  गारपीट झाली.

 

परभणी  : दुसऱ्या दिवशीही तडाखा
जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याला रविवारी गारपिटीने तडाखा दिल्यानंतर सोमवारी दुसऱ्या दिवशीही तडाखा बसला. तर पूर्णा तालुक्यातील चुडावा, कावलगाव व गौर या मंडळामध्ये सोमवारी (दि.१२) दुपारी चारच्या वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपिटीत पत्र्याच्या शेडचा अाधार घेतलेल्या महिलेचा शेड अंगावर पडल्याने मृत्यू झाला.  तर पाच जण जखमी झाले आहेत. 

 

हिंगोली : फळबागांना बसला जबर फटका

  जिल्ह्यात  दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला.  रविवारी सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ तालुक्यात शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. सोमवारी कळमनुरी तालुक्यात येलकी, आखाडा बाळापूर या भागात तर वसमत तालुक्यातील दाभाडी, पार्डी, वसमत शहर परिसर आदी भागात अवकाळी पावसाने पिकांना आडवे केले. त्यात आखाडा बाळापूर भागात गारपीट झाल्याने संत्रा, मोसंबी, आंबा या फळ शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.  वसमतसह   हिंगोली, सेनगाव आणि औंढा नागनाथ तालुक्यात पाऊस झाला.  

 

गारपिटीचा सर्वाधिक फटका जालन्याला 
रविवारी झालेल्या गारपिटीचा सर्वाधिक फटका जालना जिल्ह्याला बसला आहे.  ४६४ गावांतील  ४६४७४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्तालयाकडील माहितीनुसार सर्वाधिक २७ हजार ९६१ हेक्टरचे नुकसान एकट्या जालना जिल्ह्यात झाले आहे.  तर बीड जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या गारपिटीत  माजलगाव, गेवराई व शिरूर तालुक्यात दहा हजार ६३२  हेक्टर   क्षेत्र बाधित  झाले अाहे.   यात सर्वाधिक नुकसान गेवराई  तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील २९ गावांतील नऊ हजार ४६०  हेक्टर वरील क्षेत्र  बाधित  झाले आहे. 

 

अशोक चव्हाण करणार आज पाहणी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण हे मंगळवारी (दि.१३) दुुपारी दोन वाजता जिल्ह्यात दाखल होणार असून ते जिंतूर तालुक्यातील कौसडी व मारवाडी या गावातील गारपीटग्रस्त भागातील शेतीची पाहणी करणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता झरी या गावातील गारपीटग्रस्तांशी ते चर्चा करणार आहेत. त्यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, गटनेते भगवान वाघमारे, महापौर मीना वरपुडकर सोबत राहतील. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...