आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूळ गावी परतण्यास राजी न झाल्याने पत्नीचा झोपेतच गळा घोटून स्वत:ही घेतला गळफास, वाळूजमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज/औरंगाबाद - वाळूज एमआयडीसी परिसरातील सिडको भागातील एका तरुणाने पत्नीचा खून करून स्वत: गळफास घेत आयुष्य संपवले. शुक्रवारी मध्यरात्री त्याने बेडरूममध्ये झोपलेल्या बायकोचा गळा घोटला आणि त्यानंतर स्वयंपाकघरात येऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रवीण प्रभाकर पाटील (३२) व आरती पाटील (२८) असे या दांपत्याचे नाव असून ते सिडको वाळूज महानगर-१ च्या गुरुदक्षिणा अपार्टमेंटमधील बिल्डिंग नंबर १ च्या घर क्रमांक ९ मध्ये राहत होेते. वाळूज एमआयडीसी सिडको ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

प्रवीण आणि आरतीचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. उच्चशिक्षित प्रवीण कंपनीत काम करत होता. दहा वर्षांत त्याने अनेक कंपन्यांमध्ये आणि रोपटे विकणाऱ्या नर्सरीमध्ये काम केले. मात्र, दोन महिन्यांपासून त्याला काम नव्हते. त्यामुळे घरात आर्थिक चणचण होती. त्यातच तो कधी तरी दारू पीत असे. त्यामुळे आरती आणि प्रवीणची भांडणे होत. यातूनच तणाव आल्यामुळे हा प्रकार झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे साहिल (७) आणि रुद्र (दीड वर्ष) ही दोन मुले पोरकी झाली आहेत.

 

मूळचे नायगाव-किनगाव (ता. यावल, जि. जळगाव) येथील रहिवासी असलेले पाटील कुटुंबीय कामानिमित्त ७ वर्षांपूर्वी वाळूज औद्योगिक परिसरात आले. साधारण ४ वर्षांपूर्वी बजाजनगरातील भाड्याची खोली सोडून ते सिडको येथील गुरुदक्षिणा अपार्टमेंटमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होते. विविध कारखान्यांमध्ये मिळेल ते काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. तो कायमस्वरूपी एकाच कामावर टिकून राहत नसल्यामुळे त्याला कायम आर्थिक चणचण भासत होती. यामुळे तो नेहमीच मानसिक तणावामध्ये राहत असल्याने त्याचे पत्नीशी भांडण होत असे. विशेष म्हणजे तो जेव्हा दारूच्या नशेत घरी येत असे, तेेव्हा पती-पत्नीमध्ये भांडण होत असे. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यातच तो पत्नीकडे 'वाळूज औद्योगिक परिसर सोडून आपण आपल्या गावी जाऊन राहूया,' असा आग्रह धरत होता. मात्र, आरती त्यास तयार नव्हती, असे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे कुठलीही चिठ्ठी सापडली नाही. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख तपास करत आहेत.

 

मृत पतीवर होऊ शकतो गुन्हा दाखल : पोस्टमॉर्टम अहवालानंतर उभयतांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र, सद्य:स्थितीत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मात्र, पत्नीचा गळा दाबून तिचा खून केल्याबद्दल मृत प्रवीणच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे साबळे यांनी सांगितले.


नातवाला उठवायला गेले अन् मृतदेह दिसला
प्रवीणच्या आईचे निधन झाल्यामुळे त्याचे वडील प्रभाकर पाटील दोन महिन्यांपासून प्रवीणसोबत सिडकोतील त्यांच्या वन बीएचके घरात राहतात. त्यांचेही बऱ्यापैकी वय झाले आहे. घटनेच्या दिवशी शनिवारी नेहमीप्रमाणे साहिलला शाळेत पाठवण्यासाठी सून का उठली नाही, हे पाहण्यासाठी म्हणून हॉलमध्ये साहिलसोबत झोपलेले प्रभाकर पाटील बेडरूमच्या दिशेने गेले. बेडरूमचा दरवाजा वाजवत सुनेला व मुलाला हाक मारली. मात्र, आतून प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी दरवाजा ढकलला. त्याच वेळी त्यांची नजर स्वयंपाकघराच्या दिशेकडे गेली असता छताच्या हुकाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलगा प्रवीण लटकलेला, तर सून बेडवर एका बाजूला निपचित पडलेली दिसली. हे पाहून त्यांनी टाहो फोडला. स्वत:ला सावरून खालच्या मजल्यावर राहणाऱ्या लहान मुलाकडे धाव घेत त्याला घटनेची माहिती दिली.


मोबाइलचा शोध घेत आहेत पोलिस
आरतीचा मोबाइल घटनास्थळी पोलिसांना सापडला नाही. शिवाय कुठली चिठ्ठी, डायरीही सापडली नाही. त्यामुळे पत्नीचा खून करून स्वत: गळफास घेण्याचे नेमके कारण काय हे स्पष्ट नाही. नातेवाइकांच्या जबाबावरून पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी ओढणी, दोरी आदी साहित्य ताब्यात घेतले. मात्र, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दोघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले. फौजदार आरती जाधव व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...