आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनाने वेळेत कर्जवाटप शक्य, दोन बँकांनी मराठवाड्यात करून दाखवलं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात एकीकडे कर्जवाटप १८ टक्केच होत असताना महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि लातूरची जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज वाटपात आघाडीवर आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आतापर्यंत ४५० कोटी, तर लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५८७ कोटी (१०८ टक्के) कर्ज वाटप केले. दोन महिने अगोदरपासूनच नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे शक्य झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक जी. जी. वाकडे यांनी सांगितले. 


महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ८८० कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना ६० टक्के वाटप बँकेने पूर्ण केले आहे. मराठवाड्यात महाराष्ट्र ग्रामीण आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकांनीच सर्वाधिक कर्ज वाटप केले. वाकडे यांनी सांगितले की, बँकेच्या ज्या खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे, त्यांना कर्जवाटप करण्यात आले. त्यासाठी सर्व बँकेच्या व्यवस्थापकांना तातडीने कर्जवाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 


स्केल ऑफ फायनान्सपेक्षा २० टक्के अधिक कर्जवाटप 
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ४०९ शाखा आहेत. त्यामध्ये जवळपास पावणेचारशे शाखा मराठवाड्यात आहेत. बँकेला ७८४ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. यामध्ये दीड लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. बँकेच्या वतीने नव्या खातेदारांचाही शोध घेत नव्या शेतकऱ्यांना देखील कर्जवाटप करण्यात आले. तसेच स्केल ऑफ फायनान्सपेक्षा २० टक्के अधिक कर्जवाटप करण्यात आल्याचे वाकडे यांनी सांगितले. 


लातूर मध्यवर्ती बँकेचे उद्दिष्ट पूर्ण 
मराठवाड्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जवाटपात आघाडीवर आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने १ लाख ४९ हजार ८०७ शेतकऱ्यांना ५८७ कोटींचे कर्जवाटप केले. हे कर्जवाटप १०८ टक्के आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला ५४३ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 


दीड लाख शेतकऱ्यांना पाठवले एसएमस 
कर्जमाफी झाल्यानंतर बँकेच्या वतीने ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचे एसएमएस पाठवण्यात आले होते. त्यामध्ये तुमचे कर्ज माफ झाले असून नव्याने पीक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले होते. बँकेत शेतकऱ्यांना पीक कर्ज माफीचा फॉर्म भरून घेताना त्यांना एकदाच फाॅर्म स्वीकारत त्यांना कर्ज मिळवण्याची तारीख देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत जाऊन कर्ज घेण्यात कोणतीही अडचण आली नव्हती. 


केवळ ३० टक्केच वसुली 
मराठवाड्यात औरंगाबाद आणि लातूर दोनच जिल्हा मध्यवर्ती बँँका सध्या चांगल्या स्थितीत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची वसुलीच ३० टक्के झाली आहे. आर.बी.आयच्या नियमानुसार पहिले कर्ज नाही भरले, तर नव्याने कर्ज देता येत नाही. 
- सुरेश पाटील, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक 

बातम्या आणखी आहेत...