आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना झापझाप झापले; मुकुंदवाडी, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे जनता संमेलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी पोलिस आयुक्तांचे संमेलन भरले होते. यात बहुतांश गर्दी विशेष पोलिस अधिकाऱ्यांचीच होती. तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात झाली आणि पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नांपर्यंत जवळपास दोनशे जणांच्या जनसमुदायासमोर पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना झापझाप झापले.

 

तक्रारींची पार्श्वभूमी ऐकून घेण्याआधीच पोलिस आयुक्त अधिकाऱ्यांना झापत असताना नागरिक हसत होते, तर अधिकाऱ्यांचे चेहरे पडलेले होते. नाहक अपमान झाल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. अधिकाऱ्यांवरच्या चिडचिडीने एक तास उशिराने सुरू झालेले संमेलन अधिकाऱ्यांवरच्या संतापानेच संपले.

 

शुक्रवारी दुपारी एक वाजता मुकुंदवाडी, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे संयुक्त जनता संमेलन तिरुमला मंगल कार्यालयात आयोजित केले होते. पहिले दोन प्रश्न आले ते थेट सिडको कामगार चाैक ते गजानन महाराज मंदिर चौक रस्त्यावरील अतिक्रमणाचे. यावर हद्दीचे इन्चार्ज असलेल्या उपनिरीक्षकांनी स्पष्टीकरण देवूनही आयुक्त यादव काहीही ऐकण्यास तयार नव्हते. त्यांनी मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या दोन्ही उपनिरीक्षकांना दंड ठोठावला. अनेक तक्रारींत तक्रारदार अनुपस्थित राहिल्याने तर काही तक्रारींची दखल न घेतल्याने अधिकाऱ्यांनाच बोलणे खावे लागले. परंतु काही तक्रारींची कुठलीही शहानिशा न करता झापल्याने अधिकारी अचंबित झाले. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याअंतर्गत १४ तर मुकुंदवाडी ठाण्याअंतर्गत ३२ तक्रारींची यादी होती. आयुक्तांनी नावे वाचण्यास सुरुवात केली. परंतु तक्रारदारच समोर नसल्याने त्यांचा पारा चढला. कोण उपस्थित, कोण अनुपस्थित हेही मीच वाचून दाखवू का, असा संतप्त सवाल करत अधिकाऱ्यांना सुनावले. आमदार अतुल सावे, उपायुक्त राहुल श्रीरामे, माजी महापौर भगवान घडमोडे, बाल हक्क संरक्षण आयोगाचे प्रवीण घुगे, सहायक आयुक्त गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, लक्ष्मीकांत शिंगारे यांनी संमेलनासाठी परिश्रम घेतले.

 

महिला पोलिस निलंबित : एक विवाहिता तक्रार घेऊन आली. तिचा पती चालक असून पूर्वी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची तक्रार तिने केली. सध्या ही पोलिस कर्मचारी आयुक्तालयात कार्यरत आहे. मागील दोन वर्षांपासून माझ्या पतीला ती साेडत नसून तक्रारही घेत नसल्याचे तीने सांगितले. हे एेकताच प्रेम प्रकरण करणाऱ्या महिला पोलिस कर्मचारीला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.


महिला स्टेजवर आली, अंगरक्षकावर भडकले
एक सत्तरी ओलांडलेली वृद्ध महिला तिच्या भावाने बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून घर बळकावल्याची तक्रार घेऊन आली होती. ती मध्येच स्टेजवर चढली आणि यादव यांच्यासमोर उभी राहिली. हा प्रकार पाहताच त्यांचा पुन्हा पारा चढला. बाजूला उभ्या अंगरक्षकाला जवळ बोलावून दहा मिनिटे झापले. माझ्या सुरक्षेचे काही आहे की नाही, असा प्रश्न करत त्यालाही पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले. एक एक करून अधिकाऱ्यांवर होणारी सरबत्ती आणि दंडामुळे वातावरण चांगलेच गरम झाले होते.

 

मुकुंदवाडीतील ३०० एसपीओंचा परवाना तत्काळ रद्द करा
मुकुंदवाडी पोलिस ठाण्यामध्ये ४०० विशेष पोलिस अधिकाऱ्यांची (एसपीओ) नोंद आहे. कार्यक्रमाला अवघे ५० एसपीओ होते. दोन्ही पोलिस ठाणे मिळून १०० एसपीओ उपस्थित होते. हे पाहून यादव भडकले. एसपीओ ही एक कंपनी असून मी तुमचा सीईओ आहे. मी येथे असताना अधिकारी येत नाही, म्हणजे तुम्ही शिस्तभंग करत आहात. जे केवळ आयकार्ड आणि पोलिस जॅकेटसाठी एसपीओ झाले असतील त्यांचा एसपीओ परवाना तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...