आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: गोलवाडीत कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्यांवर लाठीचार्ज; मिटमिट्यात दाखवली बंदूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/वाळूज- कचराकोंडीमुळे त्रस्त असलेल्या मनपाने शनिवारी मध्यरात्री गोलवाडी फाट्यावरील खड्ड्यांमध्ये कचरा आणून टाकला. ही माहिती मिळताच म्हाडा काॅलनीसह तिसगाव परिसरातून ५० वर महिला-पुरुषांनी तेथे धाव घेत कचरा टाकण्यास विरोध केला. तेव्हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ग्रामस्थांचे मोबाइल काढून घेत त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यात एक तरुण जखमी झाला तर एकाचा मोबाइल फुटला. पोलिसांनी बळाचा वापर केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. 


नारेगाव डेपोत कचरा टाकण्यास पंचक्रोशीतील नागरिकांनी विरोध करून आंदोलन सुरू केल्यानंतर गेल्या १७ दिवसांपासून शहरात कचराकोंडी झाली आहे. वाळूज, नायगव्हाण-खंडेवाडी, बाभुळगाव, तिसगाव, गोलवाडी, कांचनवाडी परिसरात कचरा टाकण्यास तीव्र विरोध होत आहे. यामुळे प्रशासनासमोर कचराकोंडी फोडण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच न्यायालयाने पोलिस बळाचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असताना मनपा प्रशासन औरंगाबाद-नगर महामार्गालगतच्या गोलवाडीतील छावणीच्या कचरा टाकण्याच्या जागेवर शहरातील कचऱ्याचे ट्रक खाली करत आहे. शनिवारी सकाळी तिसगाव, गोलवाडी व वाळूज महानगरातील सिडको तसेच म्हाडा वसाहतीतील रहिवाशांनी विरोध करत मनपाचा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी माजी जि.प. सदस्य रामचंद्र कसुरे, तिसगावच्या सरपंच कौसाबाई कसुरे, जि. प. सदस्य कलीम सय्यद, माजी सरपंच अंजन साळवे, माजी उपसरपंच संजय जाधव, ज्योती सानप उपस्थित होते.


 
१६ ट्रक कचरा टाकला 
कचरा टाकण्यासाठी दिवसा होणारा विरोध पाहून मनपाने शनिवारी मध्यरात्रीनंतर गोलवाडीलगत कचरा आणून टाकला. ही माहिती मिळताच पहाटे २ वाजेच्या सुमारास २५ ते ३० महिला व तेवढेच पुरुष घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत तब्बल १६ ट्रक कचरा आणून टाकण्यात आला होता. ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध करत मोबाइलद्वारे कॉल करून नागरिकांना बोलावून घेतले. त्यामुळे पोलिसांनी महिलांचे ३० मोबाइल काढून घेऊन ते फेकून दिले. तरीही नागरिक ऐकत नसल्याचे पाहून १५० पोलिसांनी महिला-पुरुषांवर लाठीचार्ज केला. यात दिनेश पनबिसरे हा युवक जखमी झाला तर शिवाजी हिवाळे यांचा मोबाइल फुटला. नागरिकांची संख्या वाढत असल्याचे पाहून अखेर मनपा प्रशासनाने माघार घेतली. 

 

खा. खैरेंच्या नावाने शिमगा 
रविवारी सकाळी १० वाजेपासून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. काही नागरिकांनी खा. चंद्रकांत खैरे यांना माहिती देत घटनास्थळी येण्याची विनंती केली. तीन तास प्रतीक्षा करूनही खा. खैरे आले नाहीत. त्यांच्या प्रतीक्षेत साऊथ सिटीतील चौकात साडेपाचशेंवर नागरिकांचा जमाव जमा झाला होता. या वेळी नागरिकांनी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय सिरसाट यांच्यावर तोंडसुख घेतले. जमाव वाढत असल्याने पाहून पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांच्यासह पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, सतीश कुमार टाक, मुकुंद देशमुख, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मनोज पगारे व २०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला. 


आजपासून देणार पहारा 
तिसगाव ग्रामपंचायतीने मनपाला ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. तरीही बळाचा वापर करून कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. रविवारपासून आम्ही कचरा टाकण्याच्या जागेवर रात्रीसुद्धा पहारा देणार आहोत. या ठिकाणी भजन, कीर्तन आदी कार्यक्रम घेऊ. 
- रामचंद्र कसुरे, माजी जि. प. सदस्य, तिसगाव. 

 

वाचा संबंधीत इतर महत्वाच्या बातम्या....

>तीन दिवसांत सुटेल कचऱ्याचा प्रश्न; चार बायोमेकॅनिकल कंपोस्ट मशीन विकत घेणार : >घोडेले

>नागरिकांनी मनपाच्या पथकाला पिटाळले; मिटमिटा परिसरात तणावाचे वातावरण

दररोजच्या चारशे टन कचऱ्याचे सहज करता येईल खत

बातम्या आणखी आहेत...